ग्राहक खूश : शेतकरी आर्थिक संकटात
By Admin | Updated: July 27, 2015 00:31 IST2015-07-27T00:30:50+5:302015-07-27T00:31:32+5:30
भाज्या झाल्या दहा रुपये किलो

ग्राहक खूश : शेतकरी आर्थिक संकटात
नाशिक : एकीकडे कांद्याचे भाव ५० रुपयांपर्यंत वाढले असताना आवक वाढल्याने भाजीपाला मात्र चक्क दहा रुपये किलो इतका स्वस्त झाल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे ग्राहकवर्गात समाधान व्यक्त होत आहे.
गारपिटीमुळे कांदा खराब झाल्यामुळे बाजार समितीत मात्र कांद्याची आवक घटली असून, भाव सुमारे ३५ ते ५५ रुपये इतका झाला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत मात्र काही भागांत थोडा फार पाऊस झाल्याने आणि आता उघडीप असल्याने शेतकरीवर्गाने पिकविलेला भाजीपाला बाजार मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. रविवारी सकाळी नाशिक येथील पेठरोडवरील मध्यवर्ती बाजार समितीत सटाणा, लोहोणेर, दिंडोरी, वणी, बेज, देवळा आदि भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मेथी, पालक, भेंडी, तांबडा भोपळा आदि भाजीपाला आणला होता. पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने भाज्यांचे भाव गडगडले. भेंडी, ढोबळी मिरची, हिरवी मिरची दहा रुपये किलो, तर वाल, दोडके, गिलके, डांगर (तांबडा भोपळा) आदि भाज्या १५ ते २० रुपये किलो होत्या. पालक जुडी दोन रुपये, तर कोथंबीर व मेथीची जुडी दहा रुपये भावाने विकल्या गेली. (प्रतिनिधी)