आयुर्वेदीक रसाला ग्राहकांची पसंती
By Admin | Updated: October 14, 2016 00:20 IST2016-10-14T00:16:57+5:302016-10-14T00:20:23+5:30
आरोग्यदायी : जॉगिंग ट्रॅकलगत थाटली दुकाने

आयुर्वेदीक रसाला ग्राहकांची पसंती
इंदिरानगर : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याने इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या आरोग्यवर्धक कडधान्य रसाला मागणी वाढू लागली आहे. कडधान्य तसेच फळभाज्यांपासून बनविलेले रस आरोग्यवर्धक असल्यामुळे आता या रसांना मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे रस विक्रीसाठी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु आता योगा आणि जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढल्याने या रसाचेही महत्त्व वाढले आहे.
शहर परिसरात असलेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ अशा प्रकारचे रस तयार करून ते विक्रीसाठी आणले जातात. फळभाज्या, तसेच कडधान्यांपासून बनविलेले हे रस असल्याने त्यांच्या तुरट, आंबट आणि कडू चवीमुळे या रसाने सेवन फार कमी केले जात होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायामाविषयीची जागरूकता वाढल्यामुळे आयुर्वेदीय पेयाविषयीचीदेखील लोकांना आवड निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून लोक या आयुर्वेद पेयांकडे वळले आहेत. त्यामुळे या पेयांना मागणी वाढली असून, शहरात ज्या ज्या ठिकाणी लोक सकाळी जॉगिंगसाठी जातात अशा ठिकाणी या पेय विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. (वार्ताहर)