Crowds in the market, coronala uniforms | बाजारात गर्दी, कोरोनाला वर्दी

बाजारात गर्दी, कोरोनाला वर्दी

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. ही जीवघेणी गर्दी कोरोनाला वर्दी देणारीच ठरत असून, नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केला जात आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेची आाणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
चांदवडमध्ये कारवाई
चांदवड येथे लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सोमवारी (दि.१) भरणाºया आठवडे बाजारात जीवघेणी गर्दी दिसून आली. ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगला पुरता हरताळ फासला गेला. दरम्यान, परवानगी नसतानाही भाजीविक्रेत्यांसह काही व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने लावल्याने पोलीस प्रशासन आणि नगर परिषद यांनी संयुक्तपणे संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला. आठवडे बाजारात होणारी ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत असून, नागरिकांची ही बेफिकिरी जीवघेणी ठरू पाहत आहे.
चांदवड-मनमाड रोडवर सोमवारी (दि. १) सकाळपासून तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत भाजीपाला, फळविक्री, मिठाई व अन्य विक्रेत्यांनी परवानगी नसताना दुकाने लावली होती. ही बाब चांदवड पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात येताच मुख्य अधिकारी अभिजित कदम, नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बाजारात धाव घेतली. त्यांच्या आगमनानंतर एकच पळापळ झाली. भाजीविक्रेत्यांनी तेथून पळ काढला.
याशिवाय बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासून अनेक नागरिक विनामास्क भाजी खरेदी करत असल्याचे दिसून आले, तर दोन दुकानांमध्ये अंतर नव्हते. त्यातच काही बाहेरगावचे भाजीविक्रेते-व्यापारी आल्याने एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. नगर परिषदेने ट्रॅक्टरमध्ये भाजीपाला भरण्याची तयारी व कारवाईचा इशारा देताच सर्व व्यापारी, विक्रेते तेथून पसार झाले. दरम्यान नगर परिषदेने चार ते पाच दुकानदार व भाजीविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
--------------------------------------------
सोमवार पेठेतही गर्दी, ग्राहकांना दक्षता घेण्याचे आवाहन
सोमवार हा आठवडे बाजाराचा वार असल्याने सोमवार पेठेतही खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाली असली तरी व्यापारी व ग्राहकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य अधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी केले आहे.

Web Title: Crowds in the market, coronala uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.