रेल्वेस्थानकावर गर्दी
By Admin | Updated: September 13, 2015 23:28 IST2015-09-13T23:26:04+5:302015-09-13T23:28:58+5:30
परतीचा प्रवास : चारशेहून अधिक बस फेऱ्या

रेल्वेस्थानकावर गर्दी
नाशिकरोड : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीनिमित्त शनिवार पासुन रेल्वे व पुणे बाजुकडून रस्ता मार्गे जवळपास तीन लाख भाविक शहरात दाखल झाले होते. स्नान आटोपल्यानंतर पुन्हा लाखो भाविकांनी परतीचा मार्ग धरल्याने रेल्वे स्थानक परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. नाशिक-पुणे महामार्ग व रेल्वे स्थानकाकडे जाणारे नाशिकरोडमधील रस्त्यावर दिवसभर परतीच्या भाविकांची व वाहनांचीच रेलचेल होती.
कुंभमेळ्यात अमावस्येला असलेली व भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली दुसऱ्या पर्वणीच्या शाही स्नानासाठी रेल्वे व पुणे बाजुकडून रस्ता मार्गे शनिवारपासुन शहरात जवळपास तीन लाख भाविक दाखल झाले होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेने रविवारी पहाटेपर्यंत हजारो भाविक दाखल झाले होते. मात्र सकाळनंतर आलेल्या रेल्वेला भाविकांची जास्त गर्दी नव्हती. तर चिंचोली नाका बाह्य स्थानक आवारात मोठ्या खाजगी ट्रॅव्हलच्या बसेस, छोटी-मोठी हजारो वाहने भाविकांनी वाहनतळावर उभी करून तेथुन बसने भाविक काठे गल्ली त्रिकोणी गार्डन पर्यंत शाही स्नानासाठी जात होते. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत भाविकांना शाही स्नानास सोडण्यासाठी बसेसच्या ४०० हुन अधिक फेऱ्या झाल्या होत्या. तर रेल्वे मार्गे आलेल्या प्रवाशांना सिन्नरफाटा येथुन शहरात सोडण्यासाठी बसेसच्या ६०० अधिक फेऱ्या झाल्यात. तर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत रस्तामार्गे भाविकांची सर्व वाहने शहरात दाखल होत होती.
फक्त खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चिंचोली नाका बाह्य बस स्थानकांवर पार्किंग करण्यात येत होत्या. त्यामुळे खाजगी वाहनांची देखील गेल्या दोन दिवसांत हजारो भाविक शहरात दाखल झाले होते. मात्र शनिवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली नाका बाह्य बसस्थानक येथे नाशिक एमएच १५ ची वाहने वगळता इतर ठिकाणच्या भाविकांची वाहने शहरात सोडण्यास बंदी घातली होती. तर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ४ जवळील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी असलेल्या बस स्थानकांवरून शनिवारी मध्यरात्री पासुन बसेसच्या १२५ हुन अधिक फेऱ्या झाल्या होत्या. रविवारी पहाटेपासुन सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक-पुणे महामार्ग व नाशिकरोड परिसरातुन रेल्वे स्थानक, देवळालीगांव, मालधक्काकडे जाणारे रस्ते भाविक व वाहनांनी फुलून गेले होते. भाविक व वाहनांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी सोडविता-सोडविता पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना नाकीनव आले होते. (प्रतिनिधी)