मनोज देवरे
कळवण : भगवतीच्या भेटीच्या ओढीने रणरणत्या उन्हात शेकडो मैलांचा प्रवास करीत उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक सप्तश्रुंगी गडावर पायी पोहचून भगवतीच्या चरणी लीन झाले. गुरुवारी चैत्रोत्सवच्या पाचव्या माळेला गडावर पायी आलेल्या भाविकांनी एकच गर्दी केली भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्या मुळे श्री सप्तश्रुंगी निवासनी देवी ट्रस्ट प्रशासनावर मोठा ताण पडला. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच पायऱ्यांमध्ये ठिकठिकाणी बाऱ्या लावण्यात नियोजन प्रशासनाकडून करण्यात आल्यामुळे भगवतीचे सुलभ दर्शनाचा लाभं भाविकांना झाला.
कळवण मार्ग बुधवारी आणि गुरुवारी या दोन दिवसात लाखो भाविक गडाकडे मार्गस्थ झाले असून कळवण शहरातील वाहतूक मिनिटामिनिटात ठप्प होतं आहे. कळवण नांदुरी रस्ता भाविकांनी तुडुंब भरला आहे. आज गुरुवारी (ता. 10) भगवान महावीर जयंती, शुक्रवारी (ता. 11) चैत्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस चतुर्दशी असल्याने खानदेशवासीय मोठ्या संख्येने आईचे दर्शन घेतात. शनिवारी (ता. 12) चैत्र पौर्णिमेला खानदेशातील सर्व भाविक घराकडे परततात. त्यामुळे पुढील दोन दिवसात गडावर मोठी गर्दी असणार असून किमान पाच/ सहा लाख भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे.
आज गुरुवारी (ता 10) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पायी येणारे लाखो भाविक गडावर दाखल झाल्यामुळे ट्रस्ट प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन यांची एकच धावपळ उडाली. भगवती मंदिर गाभाऱ्यापासून ते पाटील चौक ते दवाखान्यापर्यंत ठिकठिकाणी बाऱ्या लावण्यात आल्या होत्या वेटिंग हॉलच्या खाली भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काही ठिकाणी जुने बॅरिकेट्स लावल्याने ते तुटून गेले त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष यांचे खूपच हाल झाल्याचे पाहायला मिळाले. ठिकठिकाणी बाऱ्या लावल्यामुळे भवानी चौकातील सर्व व्यावसायिकांचे धंदे ठप्प झाल्याचे व्यावसायिकानी सांगितले.