पर्वणीच्या पूर्वसंध्येला भाविकांची गर्दी
By Admin | Updated: August 28, 2015 23:08 IST2015-08-28T23:07:11+5:302015-08-28T23:08:46+5:30
राजूरबहुला बाह्य वाहनतळ : सायंकाळनंतर वाढली गर्दी

पर्वणीच्या पूर्वसंध्येला भाविकांची गर्दी
सिडको : कुंभपर्वाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राजूर-बहुला व जैन स्थानकानजीक वाहनतळाची व्यवस्था केली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत याठिकाणी भाविकांची गर्दी झालेली नव्हती; परंतु सायंकाळनंतर मात्र मुंबई तसेच कोकण भागातून येणाऱ्या भाविकांची गर्दी जाणवत होती.
प्रशासनाच्या वतीने मुंबई तसेच कोकण भागातून कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी विल्होळीनजीक असलेल्या राजूर-बहुला व जैन स्थानकलगत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांना त्यांची वाहने येथेच ठेवून महामंडळाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २८) रोजी याठिकाणी सुमारे अडीचशे बस भाविकांच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे ६ वाजेपासून बस तैनात करण्यात आल्या असल्या तरी शाहीस्नानाचा दिवस हा शनिवार असल्याने आज दुपारपर्यंत भाविकांची अत्यंत तुरळक गर्दी जाणवत होती. याठिकाणी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या भागातील बस भाविकांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. यासाठी एक विभागीय नियंत्रक, चार डीटीओ, सुमारे ६० अधिकारी देखरेख करीत आहेत.
शुक्रवारी दुपारपर्यंत भाविकांची गर्दी जाणवली नाही, परंतु सायंकाळनंतर मात्र हळूहळू गर्दी वाढली होती. राजूरबहुला येथील वाहनतळ संपूर्ण भरल्यानंतर जैन स्थानकनजीक असलेल्या वाहनतळावर वाहने पार्किंग करण्यात येणार आहे. एकूणच प्रशासनाने मुंबई व कोकण येथून येणाऱ्या भाविकांसाठी राजूरबहुला येथे वाहनतळाची व्यवस्था केली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
वाहनतळाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानात चहा, नास्त्यापासून सर्वच खाद्यपदार्थांच्या किमती वाजवी दरापेक्षा जास्त लावण्यात येत आहे. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची दिशाभूल होत असून, लूटमार करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने अंकुश ठेवण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.