नाशिक : कोराेनामुळे शहरात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत; मात्र अशा परिस्थितीतही शहरातील बाजारपेठेसह विविध बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षकांच्या मदतीने कसरत करावी लागत आहे.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन बँकांमध्ये जमा होते; मात्र या पेन्शनची रक्कम काढण्यासाठी बहुतांश पेन्शन धारकांकडे एटीएम किंवा मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँकांमध्ये नियमित ग्राहकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी होत आहे. काही बँकांमध्ये एकावेळी केवळ पाच ग्राहकांना प्रवेश दिला जात असून त्यांचे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जातो त्यामुळे बँकेच्या सुरक्षा रक्षकांसह काही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना आपले कामकाज सांभाळून ग्राहकांशी संवाद साधून त्यांची समजूत घालत गर्दी नियंत्रणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.