मनपाच्या सह्याजीरावांवर फाैजदारी कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:13+5:302021-02-05T05:41:13+5:30

नाशिक- महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकींना कोण गांभीर्याने घेते असे समजून कसेही अर्ज भरणाऱ्या आणि सह्या करणाऱ्यांना यंदा विभागीय आयुक्त राधाकृष्ण ...

Criminal action will be taken against Sahajirao of Corporation | मनपाच्या सह्याजीरावांवर फाैजदारी कारवाई होणार

मनपाच्या सह्याजीरावांवर फाैजदारी कारवाई होणार

नाशिक- महापालिकेच्या अंतर्गत निवडणुकींना कोण गांभीर्याने घेते असे समजून कसेही अर्ज भरणाऱ्या आणि सह्या करणाऱ्यांना यंदा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दणका दिला आहे. विषय समित्यांच्या निवडणुकीत चुकीची सही केली म्हणून ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांची चाैकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशच त्यांनी दिले असून त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर अंतर्गत निवडणुकीत जेमतेम स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सभापती- उपसभापतीपदासाठीचे अर्ज गांभीर्याने तपासले जातात. मात्र, अन्य निवडणुकांकडे फार गांभीर्याने बघितल्या जात नाहीत. त्यामुळेच राज्य शासनाने सर्व निवडणुकांसाठी विभागीय अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्याची तरतूद केली असून त्यांचे गांभीर्य आता महापालिका पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण, शहर सुधार, आरेाग्य व वैद्यकीय सहाय समिती आणि विधी समितीच्या निवडणुका १० डिसेंबर रोजी पार पडल्या. यावेळी शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदासाठी भाजपाच्या छाया देवांग यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या इंदुबाई नागरे यांच्या स्वाक्षरीत आणि मनपाच्या अभिलेखावरील स्वाक्षरीत फरक आढळला. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. परंतु, त्याचबरोबर उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अलका आहिरे यांच्या अर्जावरील सूचक म्हणून सुमन भालेराव अशी सही करणाऱ्या या नगरसेविकेची कागदोपत्री मात्र सुमन मधुकर भालेराव अशी असल्याने हा अर्ज बाद झाला. त्यानंतर आरोग्य वैद्यकीय सहायक समितीच्या सभापतीपदासाठी पुष्पा आव्हाड यांचा अर्जदेखील अर्ज अशाच प्रकारे बाद झाला. महापालिकेच्या वतीने नव्याने निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांनी अगोदरच्या प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेशित केले असून सह्या बनावट असतील तर पीठासन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले आहे.

इन्फो...

इतिहासात प्रथमच महापालिकेत असा प्रकार घडला आहे. आता चौकशी करण्याची कार्यवाही करावी लागणार असली तरी नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Criminal action will be taken against Sahajirao of Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.