हॅकर सालेचा विरोधात पुणे, गुजरातमध्येही गुन्हे
By Admin | Updated: July 5, 2017 01:16 IST2017-07-05T01:16:05+5:302017-07-05T01:16:20+5:30
नाशिक : अटक करण्यात आलेला हॅकर दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा याने अकाउंट हॅक केल्याचे समोर आले आहे़

हॅकर सालेचा विरोधात पुणे, गुजरातमध्येही गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी राजस्थान येथून अटक करण्यात आलेला हॅकर दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा (२४, रा. जसोलगाव, तहसील पचपदरा, जि़ बाडमेर, राजस्थान) याने महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात येथील नागरिकांचेही अकाउंट हॅक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ त्यापैकी पुणे येथे तीन तर गुजरातमध्ये एक गुन्हा दाखल असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे अनिल पवार यांनी दिली आहे़
हॅकर सालेचा याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच जीमेलही हॅक केले असून, नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे का याबाबत चौकशी सुरू आहे़ महिलांसोबत अश्लील संवाद करण्याची विकृती असलेला दीप्तेश याने प्रारंभी मित्रांचेच अकाउंट हॅक केले होते़ यानंतर मुंबई, पुणे, नाशिक येथील महिलांचे अकाउंट हॅक केले व त्यांच्याशी अश्लील संवाद साधला़ त्याचा माग काढून सायबर पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर वायफाय राऊटर, मोबाइल असे साहित्यही जप्त केले़
हॅकर सालेचा यास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ पोलीस तपासात आतापर्यंत तीन राज्यांतील सुमारे शंभरहून अधिक नागरिकांचे अकाउंट त्याने हॅक केल्याचे समोर आले असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे़