गंगापूररोड परिसरात वाढती गुन्हेगारी
By Admin | Updated: July 15, 2014 00:45 IST2014-07-15T00:07:04+5:302014-07-15T00:45:00+5:30
गंगापूररोड परिसरात वाढती गुन्हेगारी

गंगापूररोड परिसरात वाढती गुन्हेगारी
नाशिक : गंगापूररोड परिसरात चोरी, घरफोड्या आणि मंगळसूत्र खेचण्याच्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी त्यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गंगापूररोड भागात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात १० तारखेला कॉलेजरोड आणि डिसूझा कॉलनीत एकाच दिवशी दोन घरफोड्या झाल्या. तसेच एका ठिकाणी दवाखान्यातील वस्तू चोरण्याचा प्रकार घडला. गेल्या मंगळवारी गंगापूररोडवरील तुळजाभवानी मंदिराची पेटी फोडण्यात आली. आकाशवाणी केंद्र परिसरात अनेकदा सोनसाखळी आणि मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार होतात. तसेच भाजीबाजारात पाकीट आणि मोबाइल चोरीस जातात. प्रसाद मंगल कार्यालयासमोरील कॉलेज परिसरात टवाळखोर मुलांचा त्रास असून, मद्यधुंद तरुणांमुळे वाद होत असतात. आसारामबापू पुलाजवळ मोटारसायकलच्या कसरती केल्या जातात. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला पायबंद घालावा, अशी मागणी दीपक दातीर, सचिन बांडे, रवींद्र आव्हाड, उमेश चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)