निसर्गातूनच देव संकल्पनेची निर्मिती : इरफान इंजिनिअर
By Admin | Updated: March 26, 2017 22:23 IST2017-03-26T22:23:16+5:302017-03-26T22:23:16+5:30
आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे, असे मत नास्तिक विचारवादी व्याख्याते इरफान इंजिनिअर यांनी व्यक्त केले.

निसर्गातूनच देव संकल्पनेची निर्मिती : इरफान इंजिनिअर
नाशिक : आदि मानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे, असे मत नास्तिक विचारवादी व्याख्याते इरफान इंजिनिअर यांनी व्यक्त केले.
निसर्गातील आपत्कालीन समयी भीतीने तत्कालीन परिस्थितीत मानवाने कर्मकांडाला प्राधान्य दिले. असे कर्मकांड घडवून आणणारे पुढे धार्मिक स्थळांच्या माध्यमातून ईश्वर आणि ईश्वरवादी धर्माच्या आधारे इतरांना निसर्गातील या वस्तुस्थितीपासून दूर ठेवत अज्ञानात ढकलू लागले. यातील ज्यांनी बंड करून या ब्रह्मांडातील सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची गाथा पाण्यात बुडविणारे याच विचारधारेचे पाईक होते, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिक येथे विवेकधारा ग्रुपतर्र्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नास्तिकांच्या ब्राइट संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्त्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे उपस्थित होते.