संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग कारागीर व्यस्त : संक्रांतीला वाण देण्यासाठी महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:32 IST2021-01-02T17:32:04+5:302021-01-02T17:32:23+5:30
चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग कारागीर व्यस्त : संक्रांतीला वाण देण्यासाठी महत्त्व
चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
निफाड तालुक्यातील कुंभार समाज जुन्या पद्धतीनेच चाकाचा वापर करून सुगडे(बोळके) तयार करत आहे. मागील महिन्याभरापासून चांदोरी सह परिसरातील पिंपळस, चाटोरी, चितेगाव, सायखेडा व गोदाकाठ परिसरात व तालुक्यातील इतर गावांमध्ये सध्या कुंभार समाज बांधव सुगडे बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या दिवशी महिलांना वाण देण्यासाठी सुगड्यांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे.
बाजारात अनेक रेडीमेड प्लास्टीकचे सुगडे विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. मात्र, धार्मिकदृष्ट्या मातीच्या सुगड्यांचेच महत्त्व आहे. त्यामुळे महिला या सुगड्यांनाच पसंती देत असतात. सध्या निफाड तालुक्यातील सर्वच कुंभार समाज बांधव सुगडे घडविणे, वाळविणे व भाजने आदी कामांमध्ये मग्न आहे.
आजच्या आधुनिक युगात बारा बलुतेदरीच्या अनेक व्यावसायिकांना घरघर लागली आहे. मात्र, उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी लागणारा माठ, रांजण त्यास पर्याय नाही. त्यामुळे आजच्या युगातही आमचा पारंपरिक व्यवसाय तग धरून आहे.
- तुषार गारे, युवक सचिव, महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था