पडघम निवडणुकीचे
संजय पाठक,
नाशिक : महापालिकेच्या तीस वर्षांच्या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत अनेक छोट्या पक्षांनी मोठी भूमिका बजावली असली, तरी यातून त्यांना फार मोठी मजल मारता आलेली नाही. तीन अपक्षांनी किमान तीन वेळा महापौर पद मिळवले आहे, मात्र तशी संधी छोट्या पक्षांना मिळालेली नाही.
नाशिक महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत १९९२ मध्ये माकपच्या ॲड. वसुधा कराड, पीपल्स रिपाइंचे गणेश उन्हवणे हे निवडून आले होते. शेकापचे ॲड. जे. टी. तथा जयराम तोलजी शिंदे निवडून आले होते. याच पक्षाचे ॲड. मनीष बस्ते अपक्ष निवडून आले होते. १९९७ मध्ये बस्ते उपमहापौर देखील झाले, पण त्यांना पुढे यश आले नाही. जे. टी. शिंदे २००७ मध्ये निवडून आले. नंतर त्यांना संधी मिळाली नाही.
रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांनी महापालिकेत अपवादात्मक हजेरी लावली असली, तरी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. प्रकाश लोंढे, संजय भालेराव आणि आता प्रकाश लोंढे यांच्यानंतर त्यांची सून दीक्षा लोंढे या विद्यमान नगरसेविका आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वगळता अन्य पक्षांचे मात्र फारसे टिकलेले नाही. १९९२ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वसुधा कराड एकमेव नगरसेवक होत्या. १९९७ मध्ये त्यांच्या जोडीला ॲड. तानाजी जायभावे निवडून आले. जायभावे तीन वेळा निवडून आले. वसुधा कराड २००७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झाल्या. मात्र, २००८ मध्ये साधना जाधव यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. २०१२ मध्ये ॲड. तानाजी जायभावे तसेच सचिन भोर आणि नंदिनी जाधव हे निवडून आले. कारकीर्द संपताना भोर हे शिवसेनेच्या कुंपणावरून परत आले, तर नंदिनी जाधव यांनी पुढे शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे पक्ष तत्त्वावर कायम असल्याने २०१२ मध्ये मनसेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने तटस्थ राहून बाय दिला. मात्र, ॲड. तानाजी जायभावे यांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या दोन्ही निवडणुका पराभव दिसत असतानाही लढल्या. २०१७ मध्ये मात्र या पक्षाला यश आले नाही.
२००७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, अपक्ष आणि छोटे पक्ष बऱ्यापैकी निवडून आल्याने त्यांचं चांगभलं झाले. लोकजनशक्ती पार्टीच्या रिमा भोगे या एकमेव नगरसेविका निवडून आल्या होत्या. त्यावेळी कोणत्या पक्षाला बहुमत नसल्यामुळे शिवसेनेचे अपक्ष उमेदवार विनायक पांडे यांनी छोट्या पक्षांचा जुगाड जमवून आणला. त्यावेळी रिमा भोगे यांनी पाठिंबा द्यावा यासाठी त्यांचे वडील भगवान भोगे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आले. त्यामुळे या पक्षाचे एक निर्वाचित आणि एक स्वीकृत असे दोन नगरसेवक झाले होते. त्याच वर्षी बहुजन समाज पार्टीला देखील चांगले यश मिळाले असल्यामुळे प्रा. कविता कर्डक, सुजाता काळे आणि ज्योती शिंदे या तीन नगरसेविका निवडून आल्या. अर्थात, या तिघींमध्ये फारसे सख्य नव्हते. पुढे कविता कर्डक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झाल्या. लोकजनशक्ती पार्टीचे भगवान भोगे देखील मूळचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. ते लोकजनशक्ती पार्टी सोडून नंतर शिवसेनेमध्ये दाखल झाले.
इन्फो===
समाजवादी पक्षाकडून २००२ मध्ये शेख सलीम अब्बास निवडून आले होते. त्यांच्यानंतर २००७ मध्ये मुशीर सय्यद यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. २०१२ मध्ये ते पराभूत झाले आणि २०१७ मध्ये ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.