Cousin rapes niece by cousin | चुलत मामाकडून भाचीवर बलात्कार
चुलत मामाकडून भाचीवर बलात्कार

नाशिकरोड : उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी वाहेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या उपनगर परिसरात एका सोसायटीच्या वाहनतळात वास्तव्यास असलेल्या दांपत्याच्या अल्पवयीन चिमुकली सोबत तिच्या चुलत मामाने सलग तीन महिने अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली. पीडित बालिकेचे आई-वडील मोलमजुरी व वॉचमनचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या बारा वर्षांच्या मुलीच्या पोटात दोन दिवसांपूर्वी वेदना होऊन उलट्याचा त्रास झाला. त्यामुळे तिला कुटुंबीयांनी जवळच्या मनपा दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी केलेल्या तपासणीत पुढे आले. मुलीचा सतीश नावाचा चुलत मामा हा दोन-तीन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने पीडितेचे आई, वडील मोलमजुरीला गेल्याचे बघून भाची एकटीच असताना तिच्यासोबत गैरवर्तन करत तोंडात रुमाल कोंबून चाकूचा धाक दाखवून ‘तू जर ओरडली तर मारून टाकेन’ असा दम देत अतिप्रसंग केला. जर कोणाला सांगितले तर भावाला मारून टाकेन, असा दम दिला. सतीशने वारंवार रात्री मुक्कामास थांबून भाचीवर सात ते आठ वेळा अतिप्रसंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cousin rapes niece by cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.