साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 14:42 IST2019-09-08T14:35:32+5:302019-09-08T14:42:59+5:30
गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे.

साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर
नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये कुठल्याही सेनेच्या चमूने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या कुशीत असलेल्या गंगोत्री-१, २ व ३ हे पर्वत सर करण्याचे लक्ष्य घेऊन नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या १८ जवानांचा चमू शनिवारी (दि.७) सकाळी रवाना झाला. मेजर जनरल संजय थापा यांनी ध्वज देऊन चमूला ‘मिशन गंगोत्री’साठी शुभेच्छा दिल्या. चमूने ही मोहीम यशस्वीपणे ‘फत्ते’ केल्यास तोफखान्यासह भारतीय सेनेच्या इतिहासात एका वेगळ्या साहसी विक्रमाची नोंद होईल.
तोफखाना केंद्राच्या जवानांनी गंगोत्री पर्वतारोहणाची साहसी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर केंद्रातील १८ जवान सहभागी झाले असून, मेजर करण दया, मेजर जे. एस. सोढी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून (दि.९) जवानांचा चमू पर्वतावर चढाई करण्यास सुरुवात करणार आहे. गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे. या संपूर्ण मोहिमेचा कालावधी १० आॅक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
या चमूला गंगोत्री मोहिमेसाठी ध्वजप्रदान करताना मेजर जनरल थापा म्हणाले, निसर्गापुढे कोणाचेही चाललेले नाही हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. निसर्गाशी जो खेळण्याचा प्रयत्न करतो त्याला निसर्ग कधीही माफ करत नाही. त्यामुळे वातावरणातील आव्हाने, धोके ओळखून गंगोत्रीची चढाई यशस्वी करावी. ‘जोश’सोबत ‘होश’ सांभाळून मोहीम फत्ते करावयाची आहे, याचा विसर पडू देऊ नये, असा सल्ला त्यांनी यावेळी चमूला दिला.