बरोबर अकरा वर्षांपूर्वी.
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T01:57:19+5:302014-08-10T02:01:42+5:30
बरोबर अकरा वर्षांपूर्वी.

बरोबर अकरा वर्षांपूर्वी.
..नाशिक : तत्कालीन केंद्र सरकारने आखाडे, मठ व आश्रमाच्या मोकळ्या जागा व संपत्ती ताब्यात घेण्याचा सुरूकेलेला प्रयत्न व त्यातून साधू-महंतांमध्ये निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरची तपोभूमी तप्त झालेली होती. बारा वर्षांनी गोदावरीच्या उगमस्थानावर भरणाऱ्या कुंभमेळ्याची त्याला पार्श्वभूमी असल्याने सरकारचा निषेध म्हणून त्र्यंबकच्या पुरोहित संघाने कुशावर्तात आयोजित केलेल्या ध्वजारोहणावरच बहिष्काराची घोषणा केली गेली आणि ध्वजारोहणासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री, आदिवासीमंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांवरच तोफ डागण्यात आली.
प्रसंगबरोबर अकरा वर्षांपूर्वीचा. ३० जुलै २००३ रोजी सिंहस्थाच्या पवित्र पर्वाचा प्रारंभच मुळात वादाने सुरू झाला. त्यामुळे पुरोहित संघाच्या ध्वजारोहणानंतर १० आॅगस्ट रोजी होणाऱ्या आखाड्यांच्या ध्वजारोहणापर्यंत हा वाद कायम होता. त्र्यंबकेश्वरी शैवपंथीयांच्या भरणाऱ्या या कुंभासाठी दहा आखाडे आहेत. त्यात श्री तपोनिधी आनंद आखाडा, श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री शंभुपंच दशनाम जुना आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचअग्नी आखाडा, श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी, श्री शंभुपंच दशनाम आवाहन आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा यांचा समावेश आहे. ३० जुलै रोजी पुरोहित संघाच्या ध्वजारोहणानंतर प्रतिदिवशी एकेक आखाड्यांचे ध्वजारोहण करण्यात आले. १० आॅगस्ट रोजी त्याची समाप्ती करण्यात आली.
‘बम बम भोले, हर हर महादेव’ अशा घोषणा व गगनभेदी शंखनिनाद करीत, नागासाधूंच्या उपस्थितीत अखेरच्या आखाड्याचे ध्वजारोहण होऊन देवदेवतांची प्रतिष्ठापणा करण्यात आली. प्रत्येक आखाड्याचा धर्मध्वज पारंपरगतपणे वेगळा असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक आखाड्यात ध्वजारोहणप्रसंगी हजर राहून प्रमुख साधू-महंतांचे पुष्पहार घालून स्वागत केले.