नगरसेवक सरसावले, आरोग्यासाठी निधी देण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST2021-04-18T04:13:37+5:302021-04-18T04:13:37+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर आलेल्या निवडणुकीसाठी खरे तर गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरपासूनच ...

नगरसेवक सरसावले, आरोग्यासाठी निधी देण्यावर भर
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अवघ्या आठ ते नऊ महिन्यांवर आलेल्या निवडणुकीसाठी खरे तर गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरपासूनच राजकीय पक्षांनी तयारी दर्शवली होती. राजकीय नेत्यांच्या बैठका आणि मेळावे सुरू झाले होते. स्वबळावरील लढ्याचे नारेदेखील घुमू लागले होते. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरण्याचे काम सुरू केले होते. इतकेच नव्हे अनेक नेत्यांचे दौरेदेखील सुरू झाले होते. विभागीय स्तरावरील मेळावेदेखील सुरू झाले असताना आता मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. त्यानंतर राजकीय मेळावे-दौरे बंद झाले.
आता तर कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
शहरात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यातील गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनाही आपल्या प्रभागातील नागरिकांना मदत करताना दमछाक सहन करावी लागत आहे. सध्या तर ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने प्राणवायू देण्यासाठी नाशिक महापालिकेने अलीकडेच १०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदी केले आहेत. ते उपयुक्त ठरू लागल्याने अनेक नगरसेवकांनी आता नगरसेवक निधी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर खरेदीसाठी खर्च करावेत, अशी मागणी केली असून प्रवीण तिदमे, श्यामला दीक्षित, रुची कुंभारकर, वर्षा भालेराव यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आयुक्तांना यासंदर्भात पत्रदेखील दिले आहे.