नगरसेवक आक्रमक
By Admin | Updated: January 20, 2016 23:29 IST2016-01-20T23:27:00+5:302016-01-20T23:29:04+5:30
सिडको प्रभाग सभा : भाजीबाजाराच्या अतिक्रमणाबाबतही नाराजी

नगरसेवक आक्रमक
सिडको : सिडको भागातील काही घरांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसताना दुसरीकडे मात्र त्याच भागात घरांच्या समोर राहणाऱ्या नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व नागरिकांना पुरेसा व समान पाणीपुरवठा करावा, तसेच येथील चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यालगत भरणाऱ्या अनधिकृत भाजीबाजाराविषयी वारंवार सांगूनही कारवाई केली जात नसल्याने यात अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
सिडको प्रभाग सभा सभापती कांचन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी लाखो रुपयांच्या कामांना एका मिनिटात परवानगी देण्यात आली. यावेळी नगरसेवक कल्पना पांडे यांनी सांगितले की, प्रभागातील अंतर्गत रस्त्यांमध्ये घंटागाडी पोहचत नसून यासाठी गल्लीबोळात जाऊ शकेल, अशी मिनी घंटागाडी अनेकदा सांगूनही सुरू केली नाही. तसेच शिवाजी चौक येथील भाजीबाजाराचे अतिक्रमण हटविण्यात यावे, असे सांगितले. नगरसेवक हर्षा बडगुजर म्हणाल्या की, प्रभागातील नागेश्वर चौकात लाखो रुपये खर्च करून नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर सुविधा नुकत्याच पुरण्यात आल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील मैदानाला ठिकठिकाणी खड्डे पाडून अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धांना कोणी परवानगी दिली. यामुळे लाखो रुपयांच्या कामाचा चुराडा होत असून याची नुकसानभरपाई कोण करणार, असे सांगून हर्षा बडगुजर यांनी मनपाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. नगरसेवक शोभा फडोळ यांनीही, प्रभागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पाण्याच्या टाक्या स्वच्छ होत नसल्याचे सांगितले. तर नगरसेवक उत्तम दोंदे यांनीदेखील प्रभागात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसून लाखो लिटर पाणी जाते कुठे? असा सवाल करीत हे अधिकारी पाण्याबरोबरच पाण्याचा टॅँकरही विकतात का, असा आरोपही दोंदे यांनी केला. तर एकाच ठिकाणच्या परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तफावत आहे. काही नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही तर काहींना मात्र धो धो पाणीपुरवठा होत असून, याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे नगरसेवक रत्नमाला राणे यांनी सांगितले.
नगरसेवक वंदना बिरारी यांनी प्रभागातील घंटागाडीची दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले. तसेच रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी नगरसेवक शीतल भामरे यांनीही प्रभागातील मोरवाडी, अश्विननगर, मोरवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. नगरसेवक शोभा निकम यांनी प्रभागात पथदीप बंद असल्याचे सांगितले. (वार्ताहर)