पालिकेला मिळणार 64 कोटी
By Admin | Updated: December 23, 2015 00:02 IST2015-12-23T00:00:07+5:302015-12-23T00:02:04+5:30
थकीत सिंहस्थ अनुदान : गुणवत्ता प्रमाणपत्रानंतर कार्यवाही

पालिकेला मिळणार 64 कोटी
नाशिक : महापालिकेला दीर्घ प्रतीक्षेनंतर सिंहस्थांतर्गत थकीत २०२ कोटी रुपयांपैकी ६४ कोटी रुपयांचे अनुदान सोमवारी (दि.२८) हातात पडण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रलंबित देयके अदा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आधी कामांची गुणवत्ता प्रमाणपत्रे सादर करा, त्यानंतरच निधी अदा करण्याचा पवित्रा जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी वितरणास हिरवा कंदील मिळाला असून, लेखा विभागाने त्यास दुजोरा दिला आहे.
महापालिकेने सिंहस्थ कामांसाठी शासनाकडे १११९ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यातील २०० कोटी रुपये भूसंपादनासाठी महापालिकेने उभे करायचे होते, तर उर्वरित ९१९ कोटी रुपयांमध्ये ७५ टक्के हिस्सा म्हणजे ६८९ कोटी रुपये राज्य शासन महापालिकेला सिंहस्थ अनुदान म्हणून अदा करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी १८ सप्टेंबरला संपली. पर्वकाळातच महापालिकेला शासनाकडून ४८७ कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. २०२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त होणे बाकी आहे. सिंहस्थ पर्वकाळ उलटून अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून निधी वितरित होत नव्हता.