जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १३१ नवे बाधित : ७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:27 IST2020-06-22T00:25:54+5:302020-06-22T00:27:10+5:30
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. २१) १३१ नवीन बाधित आढळून आले आहेत. याशिवाय कोरोना आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर; १३१ नवे बाधित : ७ जणांचा मृत्यू
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. २१) १३१ नवीन बाधित आढळून आले आहेत. याशिवाय कोरोना आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.
येवला शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. रविवारी (दि.२१) आढळलेल्या जिल्ह्यातील १३१ बाधितांपैकी १७ बाधित रुग्ण येवल्यातील आहेत. शिवाय नाशिक महापालिका हद्दीतील तब्बल १०८ रुग्णांचा देखील समावेश आहे. नाशिक मनपा क्षेत्रात रविवारी ६ जणांचा, तर येवला येथील एक अशा एकूण सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या १६५ वर पोहोचली आहे.
रविवारी कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये २० रुग्ण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. एकीकडे मालेगावच्या बाधितांचे प्रमाण कमी होत असताना येवला शहरात बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी आढळलेल्या १३१ बाधितांसह एकूण बाधितांची आतापर्यंतची संख्या २७६६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांपैकी १६२१ रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ५९.६८ म्हणजेच ६० टक्क्यांच्या आसपास आहे.
येवल्यात १७ नवे बाधित
येवला शहर व तालुक्यात रविवारी दिवसभरात नवे १७ बाधित आढळून आल्याने कोरोनाचे संकट गडद झाले आहे. २३ रूग्णांपैकी १७ अहवाल रविवारी प्राप्त झाले. शिवाय जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या पिंजारगल्लीतील ६० वर्षीय वृध्दाचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, खाजगी लॅबकडून एका वृध्दाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या १०९ तर कोरोनाबळींची संख्या ७ झाली आहे.
इगतपुरी तालुक्यात रुग्णसंख्या १३
इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथील एक २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सदर महिलेला देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या संपर्कातील ६ जणांना होम क्वॉरंण्टाइन करण्यात आले आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या
१३ झाली असुन प्रशासनाने साकूर फाटा गावातील सर्व रस्ते सील केले आहेत.
सायखेड्यातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा
कोरोनाबाधित असताना माहिती लपवून ठेवत उपचार केल्याच्या आरोपावरून सायखेड्यातील एका डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोना रु ग्ण आढळून आले आहे. या काळात सायखेडा येथील डॉक्टराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांनी ही माहिती दडवून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.