चांदवड शहरात कोरोनाचा पहिला बळी; ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू; बाधितांची रुग्णसंख्या पोहोचली पाचवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:26 IST2020-06-18T22:42:05+5:302020-06-19T00:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चांदवड : येथे ५९वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस होता, ...

चांदवड शहरात कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने शहरात घरोघरी जाऊन जनजागृती व सर्वेक्षण करतांना शिक्षक, आरोग्य कर्मचारी.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथे ५९वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस होता, तर तो मूळचा चांदवड येथील राहणारा आहे. येथील डीसीएचसी केंद्रात काम करणाऱ्या २५ वर्षीय कोविडयोद्ध्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चांदवडकरांची चिंता वाढली असून, आता शहराची संख्या पाचवर गेली आहे.
शहरातील मुल्लावाडा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १६ संशयित व्यक्तीचे अहवाल गुरुवारी दुपारी निगेटिव्ह आले आहेत तसेच डीसीएचसी केंद्र चांदवड येथे कार्यरत कर्मचारी यांच्यापैकी एक २५ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर मोरेमळा येथील ५९ वर्र्षीय मयत इसमाचा अहवाल प्राप्त झाला असून, तोही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा एक ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. सदरचा रुग्ण कल्याण येथे रेल्वेत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले तर त्यास निमोनियाची लक्षणे
होती.मृत व्यक्ती मोरे मळा, आयटीआय रोड येथील रहिवाशी होते. नांदगाव येथे रेल्वेमध्ये लॉकडाऊन काळात दोन महिने काम करून ते कल्याण येथे रेल्वेत नोकरीस गेले. त्यांना कल्याण येथे खूपच त्रास होऊ लागल्याने तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना आपल्या घरी जाऊन तेथील सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. चांदवड येथे आल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन कोणतेही उपचार घेतले नाही.
अतिगंभीर अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता मृत म्हणून घोषित केले. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे सिद्ध झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे चांदवडकरांची चिंता वाढली आहे.