कोरोनामुळे थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:02+5:302021-09-06T04:19:02+5:30
येवला : कोरोनामुळे थांबलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासोबतच येवला शहरात अद्ययावत रुग्णालयाची मागणी होती, त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचा विकास करण्यात ...

कोरोनामुळे थांबलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरणार
येवला : कोरोनामुळे थांबलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासोबतच येवला शहरात अद्ययावत रुग्णालयाची मागणी होती, त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाचा विकास करण्यात आला आहे. याठिकाणी ऑक्सिजनसाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. भविष्यात या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ यांच्या हस्ते येवला नगरपालिका हद्दीतील देवी खुंट, नागड दरवाजा रोड येथे देवी मंदिर ते नागड दरवाजा पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनामुळे विकास कामांना उशीर झाला असला तरी विकास कामांचा हा बॅकलॉक भरून काढण्यात येईल. विकासाची कामे शहरात होत असताना शहर स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. त्यातूनच रोगावर नियंत्रण मिळणे शक्य होणार आहे. कोरोना अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही. जिल्ह्यात ऑक्सिजन साठा करण्यासाठी टाक्या बसविण्यात आलेल्या आहे. तसेच ऑक्सिजन जनरेशन प्लँट देखील विकसित करण्यात आलेले आहे. त्यामुळे येवला तसेच जिल्हाभरात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही अशीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शहरात आवश्यक असलेली सर्व विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. असे सांगून पालकमंत्री भुजबळ यांनी येत्या काही दिवसात अनेक सण, उत्सव आहे हे सर्व निर्विघ्नपणे पार पाडण्यात यावे, असे आवाहनही यावेळी केले.