मे महिन्यातील लग्नसोहळ्यांना कोरोनामुळे लागला 'ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:32+5:302021-05-08T04:14:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : कोरोनाने अनेकांच्या लग्नसोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना लॉकडाऊन नंतरच्या नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा ...

Corona takes a 'break' from weddings in May! | मे महिन्यातील लग्नसोहळ्यांना कोरोनामुळे लागला 'ब्रेक’!

मे महिन्यातील लग्नसोहळ्यांना कोरोनामुळे लागला 'ब्रेक’!

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदूरशिंगोटे : कोरोनाने अनेकांच्या लग्नसोहळ्यावर विघ्न आणल्याने नव्या जीवनात पदार्पणासाठी विवाहेच्छुकांना लॉकडाऊन नंतरच्या नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, वाढलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदर ठरलेल्या मुहुर्तानुसार लग्नपत्रिका, वाजंत्री, हॉल, आचारी, कपडे, दागिने आदींची अगोदर केलेली बुकिंग अनेकांनी रद्द केली आहे तर काहींनी समयसूचकता दाखवत विवाह समारंभात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, नवीन पायंडा पाडून कमी लोकांमध्ये विवाह सोहळा उरकून घेतला आहे.

नाशिक-पुणे महामार्गालगत सिन्नर ते नांदूरशिंगोटे दरम्यान पंधरा ते वीस मंगल कार्यालय असून दरवर्षी या भागात धूमधडाक्यात लग्न सोहळे पार पडतात. मात्र, गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या संकटाने लग्नसोहळ्यांना ‘ब्रेक’ बसला आहे. नांदूरशिंगोटे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने गेल्या काहीवर्षीपासून येथे लाॅनसंस्कृती रूजली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक येथे लग्नसोहळ्यासाठी पसंती देतात.

एरव्ही विवाह सोहळ्यात होणारे रुसवे-फुगवे, रूढी-परंपरांना फाटा देऊन, चांगला पायंडा समाजामध्ये रूजविताना मोजक्याच लोकांना आमंत्रित करून लॉकडाऊन काळात काहींनी पुढील मुहूर्ताची प्रतीक्षा न करता, 'शुभमंगल' सावधानता राखून पार पाडले आहेत. कोरोनाकाळातील निर्बंध पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये होणारे लग्नसोहळे चांगली संकल्पना पायंडा असल्याची भावना अनेक मंडळी व्यक्त करत आहेत. यावर्षी लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त मे महिन्यात येत आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी मुहूर्त नसल्याने अनेकांनी मे महिन्यातील मुहूर्ताला प्राधान्य देत विवाह निश्चित केले होते. २२ एप्रिलपासून लग्नाचे मुहूर्त सुरू झाले होते. वास्तविक १२ मेपासून वैशाख महिना सुरू होणार आहे. वैशाख व ज्येष्ठ हे महिने विवाह मुहूर्तासाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन पडला अन् इच्छुकांचा हिरमोड झाला. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न करायचे ठरल्यास कोरोना काळातील निर्बंध पाळून शुभमंगल सावधानता बाळगून कमी लोकांच्या उपस्थितीत हौसेला मुरड घालून करावे लागणार आहेत. अथवा लॉकडाऊननंतर निघणाऱ्या मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे.

इन्फो...

व्यावसायिकांना आर्थिक फटका..

लग्न म्हटले की मंगल कार्यालय, आचारी, बँडबाजा, घोडा, वाहने आदींचे अगोदरच बुकिंग करावी लागते. तर लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्नमुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदर खरेदी कराव्या लागतात. मात्र, लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे लग्नसोहळे यामुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून त्यांची वार्षिक आर्थिक गणिते बिघडली आहेत.

इन्फो...

मे महिन्यात लग्नाच्या तारखा.. १,२, ३, ४, ५, ८, १३, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ यासह जून महिन्यात ८ मुहूर्त आहेत.

Web Title: Corona takes a 'break' from weddings in May!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.