Corona killed six more people in the district | जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सहा जण दगावले

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सहा जण दगावले

ठळक मुद्देसंसर्ग : बाधितांचा आकडा ७ हजार पार

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजार पार झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होण्याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. बाधितांसह कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता कायम आहे. रविवारी बाधितांची संख्या पुन्हा दोनशेनजीक पोहोचली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. रविवारी नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ५७६ रुग्णांसह तब्बल ८२९ संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमधील १३६, जिल्हा
रुग्णालयातील १५, मालेगाव मनपा रुग्णालयातील १९, आडगाव कॉलेजमधील ५ रुग्णांचा समावेश आहे.
बळींचे सत्र कायम
नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये गेलेल्या चार बळींसह एक बळी सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील, तर अन्य एक बळी धुळे जिल्ह्यातील आहे. आतापर्यंत झालेल्या ३३२ मृत्यूमध्ये १६९ बळी नाशिक शहरातील, ७९ बळी मालेगाव मनपा हद्दीतील, ७० बळी नाशिक ग्रामीण हद्दीतील तर जिल्हा बाह्य क्षेत्रातील १४ जणांचा त्यात समावेश आहे.
मालेगावला दिलासा
रविवारी मालेगाव मनपा हद्दीमध्ये नवीन रुग्ण बाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. दुसरीकडे जिल्ह्यात अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील सातत्याने वाढतच असल्याने चिंता कायम आहे. रविवारपर्यंत पुन्हा एकदा तब्बल ८६२ अहवाल प्रलंबित राहिले असल्याचे उपलब्ध आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

Web Title: Corona killed six more people in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.