शालेय साहित्य विक्रीला कोरोनाचा मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:41+5:302021-06-20T04:11:41+5:30
नाशिक : कोरोनामुळे शाळा बंद असून यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु, त्याचा परिणाम पाठ्यपुस्तक खरेदीवर होत ...

शालेय साहित्य विक्रीला कोरोनाचा मोठा फटका
नाशिक : कोरोनामुळे शाळा बंद असून यंदाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. परंतु, त्याचा परिणाम पाठ्यपुस्तक खरेदीवर होत असल्याचे दिसून येत आहे. पुस्तक विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असून आपल्या पाल्यांसाठी नवीन पुस्तके खरेदी करणाऱ्या पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कोरोनाचा पाठ्यपुस्तक खरेदीवरही मोठा परिणाम झाल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा मंगळवारपासून (दि. १५) ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या असल्या तरी दरवर्षीप्रमाणे नाशिक शहर व परिसरातील पालकांनी रविवार कारंजा, मेनरोड, गंगापूररोड भागातील वह्या-पुस्तकांच्या दुकानांत होणारी गर्दी यावर्षी दिसत नाही. काही पालक दुकानांमध्ये येऊन पाल्यांच्या आवश्यकतेनुसार आवश्यक पुस्तकांची खरेदी करीत आहेत. मात्र अनेक शाळांकडून पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेतच केेले जाते. त्याचाही परिणाम पुस्तक विक्रीवर झाला आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी पालक विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, रेनकोट, छत्री, जेवणाचा डबा आदी वस्तूही खरेदी करतात. मात्र, सध्या केवळ ऑनलाइन शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या दुकानांकडे पालक फिरकतही नाहीत. ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू असताना विद्यार्थी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वही करतात. परंतु, घरीच बसून अभ्यास करायचा असल्यामुळे वह्या व इतर स्टेशनरी खरेदीवर सुद्धा परिणाम झाला आहे. दरम्यान, शहरात मंगळवारपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अनेक पालकांनी अद्याप आपल्या पाल्यांसाठी पाठ्यपुस्तकांची खरेदी केली नसल्याचे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले आहे.
कोट-
दरवर्षी शाळा सुरू होईपर्यंत दहा हजारहून अधिक पुस्तकांचे संच विकले जातात. मात्र यावर्षी अद्याप हजार संचही विक्री होऊ शकले नाही. शाळांमध्ये पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप असल्याने पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पुस्तके मागील वर्गातील विद्यार्थी घेत असल्याने नवीन पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाईन सुरू असल्याने पालकही पुस्तके खरेदीला उत्सुक दिसत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हे पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
- अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनर्स असोसिएशन
===Photopath===
180621\235318nsk_48_18062021_13.jpg
===Caption===
अतुल पवार