आश्रमशाळेत गुणदान घोटाळा
By Admin | Updated: December 21, 2015 00:06 IST2015-12-21T00:05:40+5:302015-12-21T00:06:53+5:30
शिक्षण मंडळाची फसवणूक : महिरावणी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेतील प्रकार

आश्रमशाळेत गुणदान घोटाळा
नाशिक : शासनाकडून मिळणारे अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळांमधील शिक्षणपद्धत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यापेक्षा बोगस गुणदान देऊन पुढच्या वर्षात ढकलले जात असल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. असाच बोगस गुणदान घोटाळा महिरावणी येथील महात्मा फुले बहुद्देशीय संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेत समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०१४ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील तब्बल ३४ विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत बोगस गुणदान पद्धतीने उत्तीर्ण केल्याचे समोर आले. आरटीआय कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. सावित्रीबाई फुले आश्रमशाळेत प्रयोगशाळा नसतानाही शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना २० पैकी १८ ते १९ गुण देऊन तो अहवाल शिक्षण मंडळाकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे मंडळाने याबाबतची कुठलीही खातरजमा न करता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत प्रात्यक्षिक गुणांचा समावेश केला. जेव्हा महाजन यांनी याबाबतची शिक्षण मंडळाकडे तक्रार केली, तेव्हा मंडळाचे सचिव आर. आर. मारवाडी यांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औताडे यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याबाबतच्या सूचना केल्या. चौकशीदरम्यान मुख्याध्यापक नवनाथ वाघ व प्रयोगशाळा परिचर एम. डी. बागुल यांनी आमच्या शाळेत प्रयोगशाळा नसल्याने सदर विद्यार्थ्यांची परीक्षा महिरावणीतीलच मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयात घेतल्याचे लेखी दिले. त्यानंतर महाजन यांनी मातोश्री गि. दे. पाटील माध्यमिक विद्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत परीक्षेबाबतची माहिती मागविली. त्यात शाळेने आमच्याकडे सदर विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नसल्याचे नमूद केले. दरम्यान चौकशी अधिकारी म्हणून नेमलेल्या औताडे आणि एम. एच. मथुरे यांनी शिक्षण मंडळाकडे पाठविलेल्या चौकशी अहवालात मुख्याध्यापक वाघ यांनी दिलेल्या लेखी पत्राचा उल्लेखच केला नसल्याने या संपूर्ण प्रकरणाला आर्थिक देवाण-घेवाणीचा गंध येत असल्याची चर्चा आहे. तसेच शिक्षण मंडळाकडून आदिवासी विकास विभागाला या संपूर्ण प्रकरणाचा खोटा आणि दिशाभूल करणारा चौकशी अहवाल सादर केल्याचा महाजन यांनी आरोप केला आहे.