‘साठी’तील प्रवाशांचे सवलतीसाठी साकडे
By Admin | Updated: March 18, 2016 00:09 IST2016-03-18T00:06:51+5:302016-03-18T00:09:04+5:30
ज्येष्ठ नागरिकांचे निवेदन : शासनाने वयोमर्यादा केली कमी

‘साठी’तील प्रवाशांचे सवलतीसाठी साकडे
नाशिक : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद वाक्य घेऊन खेडोपाडी रोज हजारो मैल धावणाऱ्या ‘एसटी’ने प्रवासभाड्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत दिली आहे. ६५ पेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी वयासंबंधी ओळखपत्र दाखविल्यास हाफ तिकिटावरच प्रवास करता येतो. परंतु यापुढे ‘साठी’ ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही सदर सवलत मिळावी, असे साकडे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध संघटनांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घातले आहे. कारण राज्य शासनानेच वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा दिला जाणार असल्याची घोषणा बरोबर तीन महिन्यांपूर्वी केली होती. दरम्यान, अशी सवलत दिल्यास आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळावर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे.
राज्यातील ६५ वर्षांवरील व्यक्तीला सध्या ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा दिला गेला आहे. मात्र मार्च महिन्यापासून ही वयोमर्यादा कमी करून ६० वर्षे करण्यात येऊन वयाची साठी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला राज्यात ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा दिला जाणार असल्याची घोषणा विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात दि. १५ डिसेंबर २०१५ रोजी विधानसभेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली होती. या घोषणेला अनुसरून तीन महिने होताच ज्येष्ठ नागरिक संघटनेने ‘साठी’तच सदर सवलती मिळाव्यात, असा तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या सुमारे २० टक्क्यापेक्षा जास्त असून, त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा जावा म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात. त्यापैकी एक सवलत म्हणजे एस.टी. भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात येते. यासाठी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड किंवा तत्सम वयाचा दाखल असलेले ओळखपत्र आवश्यक असते. या योजनेचा ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक लाभ घेतात. यापुढे ६० वर्षे वयाच्या नागरिकांनादेखील प्रवास भाड्यात सवलत देण्यात यावी, अशी मागणी होत असल्याने आधीच तोट्यात असलेल्या महामंडळात आणखी आर्थिक भर पडणार आहे. तसेच यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सवलत घेणाऱ्यांच्या संख्येत ५ टक्केपर्यंत वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)