राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:53 AM2019-04-28T00:53:28+5:302019-04-28T00:54:18+5:30

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

 Controversies in Rahul Gandhi's pilot-security | राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

Next

नाशिक : ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा पायलटने निर्णय घेतला. दरम्यान, या दोघांच्या वादामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर वातावरणातील तणाव निवळला. अर्धातासानंतर गांधी दिल्लीकडे रवाना झाले.
राहुल गांधी यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते रोडमार्गे संगमनेर येथे रवाना झाले. रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर सभेला मार्गदर्शन केल्यानंतर गांधी यांनी संगमनेर येथेच मुक्काम केला. शनिवारी सकाळी त्यांनी ओझरकडे प्रयाण केले. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या एसपीजीने पायलटच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. बॅगेची तपासणी झाल्याचे सांगितल्यावरही एसपीजी ठाम असल्याने वाद नको म्हणून पायलटने त्यांच्या हातात बॅग सोपविली. त्या बॅगेत एक पाऊच होते व त्याला कुलूप असल्याने ते उघडविण्याचा आग्रह पायलटने धरला. तथापि, पायलटने ‘तुम्ही तुमचे उघडून घ्या’ असे सांगितले. चार वर्षांपासून गांधी यांच्या विमानाचा पायलट म्हणून काम करीत असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. दोघांचे भांडण सुरू झाल्याने राहुल गांधी यांची वाट पहात असलेले पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
‘आमची मानसिकता बिघडल्याने आता विमान चालवू शकत नाही’ अशी भूमिका पायलटने घेतली. दरम्यान, थोड्याच वेळात गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लॅँडिंग झाले. त्यांना शहर अध्यक्ष शरद अहेर यांनी पायलट-एसपीजी यांच्यातील वादाची कल्पना दिली. गांधी यांनी वाद समजावून घेतल्यानंतर दोघांपैकी कोणीच कोणाची दिलगिरी व्यक्त करणार नाही, मीच दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला व वादावर पडदा टाकण्यात आला.
अग्निशामक दलाच्या वाहनात गांधी बसले
पायलट-एसपीजी दोघांमधील वाद मिटल्यानंतर पायलटने विमान सुरू केले. उड्डाणासाठी वीस मिनिटे शिल्लक असल्याने राहुल गांधी यांचे अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून चालक व जवानाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पायलट-एसपीजी यांच्यात झालेल्या वादाची कहाणीही त्यांना सांगून टाकली.

Web Title:  Controversies in Rahul Gandhi's pilot-security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.