जिल्ह्यातील शिक्षकांकडून ६० लाखांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:02 AM2021-05-09T00:02:31+5:302021-05-09T00:13:48+5:30

सायखेडा : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य विभागाची सुरू असलेली कसरत पाहून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्ह्यातून जवळपास ...

Contribution of 60 lakhs from teachers in the district | जिल्ह्यातील शिक्षकांकडून ६० लाखांचे योगदान

जिल्ह्यातील शिक्षकांकडून ६० लाखांचे योगदान

googlenewsNext
ठळक मुद्देपुढाकार : आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध, जपली माणुसकी

सायखेडा : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य विभागाची सुरू असलेली कसरत पाहून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्ह्यातून जवळपास साठ लाख रुपयांचा निधी जमवून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. ग्रामीण भागात रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असे विविध आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची साधने उपलब्ध होत नाही, त्यामुळे रुग्णांची धावपळ होते. तर अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य यंत्रणा हतबल झाली.
हे सर्व वातावरण पाहात असताना आपण समाजाचे काही तरी लागतो, याची सामाजिक जाणीव ठेवून
जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांनी पुढे येत निधी एकत्र केला. काही तालुक्यात स्वतः कोविड सेंटर सुरू केले. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर, मशीन, बेड उपलब्ध करून दिले. तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कशी मदत पोहचेल, असा विचार यात करण्यात आला आहे.

शिक्षक या राष्ट्रीय आपत्तीत कोरोना योद्धा डॉक्टर, पोलीस, आशा कर्मचारी, प्रशासन यांच्यासोबत काम करत आहे. गावागावात कुटुंब सर्वेक्षण शिक्षकांनी पूर्ण केले. कोरोना बाधित क्षेत्रात ड्युटी करत आहे. जिल्हा, तालुका सीमेवर पोलिसांना मदत म्हणून शिक्षक पुढे येऊन काम करत आहे.

याशिवाय शासनाला एक दिवसाचा पगार दिला आहे. तसेच स्वख़ुशीने पैसे जमवून आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात शिक्षक पुढे झाले आणि जिल्ह्यात जवळपास ६० लाख रुपये जमा करून आपले योगदान दिले आहे.

विमा कवच नाही....
शिक्षक सातत्याने कोरोना काळात ड्यूटी करत आहे. कुटुंब सर्वेक्षण, कोरोना बाधित क्षेत्रात ड्यूटी, तालुका, जिल्हा सीमेवर ड्यूटी करत आहे, मात्र या काळात स्वतःचे जीवन धोक्यात घालून सेवा करत आहे. मात्र शासन शिक्षकांची कोणतेही जबाबदारी घेत नाही, विमा कवच नाही की साहित्य नाही त्यामुळे शिक्षकांना आपला जीव मुठीत धरून सेवा करावी लागत आहे. शासनाने शिक्षकांना विमा कवच द्यावे, अशी मागणी होत आहे.
तालुकानिहाय जमा झालेला निधी

निफाड ४ लाख. पेठ ८ लाख पन्नास हजार, कळवण ६ लाख ३१ हजार , सिन्नर, १ लाख ७५ हजार, मालेगाव ६० हजार, नांदगाव ५ लाख ७५ हजार, येवला ४ लाख, दिंडोरी ९ लाख ५० हजार, चांदवड ६ लाख २० हजार सुरगाणा ४ लाख २४ हजार, इगतपुरी ८ लाख २५ हजार, त्रंबकेश्वर ७५ हजार ५००.

तालुकानिहाय शिक्षकांचे बळी
मालेगाव, दिंडोरी १०
निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा ६
चांदवड, सिन्नर ५
इगतपुरी, नाशिक ४
देवळा, नांदगाव ३
येवला १.

शिक्षकांनी राज्य सरकारला एक दिवसाचे वेतन देऊनही सामाजिक जाणीव म्हणून तालुका स्तरावर स्वखुशीने निधी संकलन करून आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणारे साहित्य घेऊन दिले आहे. शिक्षकांनी आताही रुग्णांना थेट सुविधा उपलब्ध होणारे साहित्य देऊन आपली जबाबदारी सांभाळली आहे.
- सुरेश धारराव, प्राथमिक शिक्षक, निफाड.

कोरोना काळात शिक्षक सगळ्यांना हेवा वाटावा असं काम करत आहे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे योगदान हे अधोरेखित करण्यासारखे आहे, सामान्य रुग्णांना दिलासा मिळेल, शिक्षकांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक.

कोरोना काळात विद्यार्थी हित लक्षात घेऊन ऑफलाइन, ऑनलाइन शिक्षणासोबत कोरोना हॉटस्पॉट ड्यूटी, कुटुंब सर्वेक्षण यात शिक्षक सातत्याने काम करत आहे. सामाजिक जाणीव म्हणून दिलेले योगदान हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
- केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी, निफाड.

Web Title: Contribution of 60 lakhs from teachers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.