नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू
By Admin | Updated: December 2, 2014 01:23 IST2014-12-02T01:23:31+5:302014-12-02T01:23:59+5:30
नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू

नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू
नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या महापुरानंतर आखण्यात आलेल्या पूररेषेमुळे शेकडो सामान्य वाडेधारक विस्थापित झाले असताना दुसरीकडे मात्र खास बड्या बांधकाम व्यावसायिकांना खास सवलत दिली की काय अशी शंका निर्माण झाली आहे. गंगापूररोडवर सुयोजित गार्डनजवळ नव्या बांधकामासाठी कामे सुरू झाली आहेच, परंतु त्यासाठी नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या खास बांधकामामुळे परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचविल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांना पालिकेकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत उलट अधिकारी लपाछपीचा खेळ खेळत असल्याने एकूणच बांधकाम आणि परवानगी विषयी संशय निर्माण झाला आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला. गंगापूररोडसारख्या नव वसाहतीच्या इमारतींच्या अनेक मजल्यांमध्ये पाणी शिरले होते. मुळातच येथे नदीपात्रालगत झालेले अतिक्रमण हा गंभीर प्रकारही त्यानिमित्ताने उघड झाला. महापालिकेने पाटबंधारे खात्यामार्फत या ठिकाणी गोदावरी नदीला पूररेषा आखण्यात आली. त्यानंतर पालिकेने नदीपात्रालगत सर्व प्रकारच्या बांधकाम परवानग्या स्थगित केल्या आणि नव्याने पूररेषेत बांधकाम परवानगीच न देण्याची भूमिका घेतली. असे असताना आता मात्र सुयोजित गार्डनजवळ नव्याने बांधकामास सुरुवात झाली आहे. पुलाच्या एका बाजूने गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे; परंतु आता रोज सायंकाळनंतर कामाला प्रारंभ होत असतो. पालिकेने एकीकडे पूररेषेत बांधकामांना परवानगी न देण्याची भूमिका घेत गावठाण भागातील पडीक वाड्यात वास्तव्य करणाऱ्यांचे जीव धोक्यात घातले असताना दुसरीकडे मात्र नदीपात्रात पूररेषेतच असे बांधकाम सर्रास सुरू आहे.
युवक कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नरेश पाटील यांनी यासंदर्भात नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसाठी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर मोठी चमत्कारिक माहिती देण्यात येत असून, त्यासंदर्भात फाईल ज्या अभियंत्याकडे आहे ते सारेच ‘नॉट रिचेबल’ होत असल्याने त्याविषयी शंका वाढली आहे. एका अभियंत्याने तर सदरच्या बांधकामासाठी पाटबंधारे खात्यातील पूररेषेतील बांधकामांसाठी ना हरकत दाखला दिला असून, संबंधित अभियंताही रजेवर निघून गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)