प्रौढांसाठीची ‘निरंतर शिक्षण’ प्रकिया बंद!
By Admin | Updated: July 10, 2016 01:09 IST2016-07-10T00:22:50+5:302016-07-10T01:09:24+5:30
प्रतीक्षा : केंद्राकडील प्रस्ताव धूळखात, कर्मचाऱ्यांकडे अल्पसंख्याक शैक्षणिक योजनेची कामे

प्रौढांसाठीची ‘निरंतर शिक्षण’ प्रकिया बंद!
विजय मोरे ल्ल नाशिक
‘साक्षरता, जाणीव-जागृती व कार्यात्मकता’ ही तीन उद्दिष्ट्ये समोर ठेवून जिल्ह्यातील प्रौढांसाठी सुरू करण्यात आलेले प्रौढशिक्षण वर्ग अर्थात निरंतन शिक्षणप्रक्रिया २००८ पासून बंद पडली आहे़ केंद्र सरकारकडे २००६ मध्ये संपूर्ण साक्षरता अभियान कार्यक्रमांतर्गत पाठविण्यात आलेला निरंतर शिक्षणाचा प्रस्ताव धूळखात पडला असून, येथील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे़
राज्यातील ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, त्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावे या हेतूने राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण साक्षरता अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत १९९९ मध्ये जिल्हा साक्षरता अभियान समिती अंतर्गत संपूर्ण साक्षरता कार्यक्रमही राज्यभर राबविण्यात आला होता़
नाशिक जिल्ह्यातील तीन लाख ५१ हजार ८५३ स्त्री-पुरुषांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते़ तर याच कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात अर्थात नोव्हेंबर २००६ मध्ये साक्षरोत्तर कार्यक्रम राबवून त्या अंतर्गत २ लाख ६१ हजार ४३४ स्त्री- पुरुषांना सहभागी करून घेण्यात आले होते़ राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्येही पहिल्या टप्प्यात साक्षरता अभियान व दुसऱ्या टप्प्यात साक्षरोत्तर कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे दोन्ही टप्पे पूर्ण होण्यापूर्वीच तिसऱ्या व महत्त्वाच्या निरंतर शिक्षण कार्यक्रमाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक कार्यालयामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला, त्याला दहा वर्षे उलटली तरी अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते़ दरम्यान केंद्र सरकारने साक्षरता अभियान कार्यक्रम बंद करून निरंतर शिक्षणाचे अभियान ‘साक्षर भारत’ या नव्या नावाने सुरू केल्याचे वृत्त आहे़