इगतपुरीत लवकरच आदिवासी संकुलाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:00 IST2020-02-14T16:59:55+5:302020-02-14T17:00:26+5:30
छगन भुजबळ : घोटी येथे डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

इगतपुरीत लवकरच आदिवासी संकुलाची उभारणी
घोटी : मुंबई, मराठवाड्यासह नाशिकला पाणी पुरवणारा इगतपुरी तालुका उन्हाळ्यात तहानलेला असतो. त्यामुळे शासनस्तरावर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, याशिवाय तालुक्यात आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी संकुलाची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डांगी जनावरांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केली. दरम्यान, पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामपालिका घोटी बुद्रुकच्यावतीने पशुसंवर्धन विभाग, तसेच जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित शेतकी, औद्योगिक, संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी भुजबळ यांनी सांगितले, इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर लवकरच भव्य दिव्य स्वरु पात चित्रनगरी स्थापन करण्यात येणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी , घोटीसारख्या शहरात एवढे मोठे प्रदर्शन होत असतांना त्यांना शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने दरवर्षी या प्रदर्शनासाठी ३ लाख रु पये निधी दिला जातो परंतु, पुढच्या वर्षी या निधीमध्ये वाढ करण्यात येऊन तो ५ लाख रु पये दिला जाईल, असे स्पष्ट केले.