पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे बांधकाम

By Admin | Updated: May 14, 2014 23:49 IST2014-05-14T23:44:14+5:302014-05-14T23:49:18+5:30

प्रभाग ५० : पावसाळ्यात पाण्याला होणार अटकाव

Construction of drainage in rainy gully | पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे बांधकाम

पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे बांधकाम

प्रभाग ५० : पावसाळ्यात पाण्याला होणार अटकाव
नाशिक : कामटवाडा शिवारातील प्रभाग ४९ व ५० ची सीमारेषा मानल्या गेलेल्या पावसाळी नाल्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी भुयारी गटारींना जोडणार्‍या ड्रेनेज लाइनचे बांधकाम केले असून, त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाण्याला अटकाव होण्याचीच अधिक शक्यता आहे.
कामटवाडा शिवारातील विखे पाटील इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे पावसाळी नाला असून, तो पावसाळ्यातच वाहतो. याच नाल्याच्या एका बाजूला लागून भुयारी गटार गेली आहे. नाल्याच्या दुसर्‍या बाजूला नव्याने इमारती उभ्या राहिल्या असून, परिसर विकसित होत असून तो प्रभाग ५० मध्ये मोडतो. मात्र अद्यापही सदरचा परिसर अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. सदरच्या परिसरात पाण्याची थेट पाइपलाइन नाही की सांडपाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटारही नाही. त्यामुळे नव्याने बांधकाम करणार्‍या इमारतींसाठी अनेक समस्या निर्माण होतात.
नव्याने उभ्या झालेल्या इमारतींचे सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकून ती नाल्याच्या दुसर्‍या बाजूने असलेल्या भुयारी गटारीला जोडली जाते. मात्र काही बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यातच बांधकाम करून भुयारी गटारीला सांडपाण्याचा पाइप जोडला. एवढेच नव्हे तर एका बांधकाम व्यावसायिकाने नाल्यातच सीमेंट कॉँक्रीटचे बांधकाम केले. येत्या पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्यास ते अडले जाण्याचीच अधिक शक्यता आहे.

नाल्यातच सोडले सांडपाणी
परिसरातील एका इमारतीचे सांडपाणी नाल्यातच सोडण्यात आले असून, त्यामुळे घाण पाणी साचून दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्यात सांडपाणी सोडणे गुन्हा असल्याने महापालिकेने संबंधित इमारतीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

नाल्यातील काम अनधिकृतच
पावसाळी नाल्यामध्ये कोणतेही बांधकाम करणे अनधिकृत आहे. नाला नैसर्गिक असल्याने त्यास अडथळा येऊन इतर समस्या निर्माण होऊ शकतात. नाल्यात सांडपाणी सोडणेही चुकीचे असून, त्याप्रकरणी महापालिका दंड आकारू शकते.
- सचिन भोर, नगरसेवक

फोटो : १२पीएचएमए७३ व ८४
कामटवाडा शिवारातील प्रभाग ५० लगतच्या पावसाळी नाल्यात करण्यात आलेल्या सांडपाणी ड्रेनेज लाइनचे अनधिकृत बांधकाम.

Web Title: Construction of drainage in rainy gully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.