बीओटीच्या रस्त्यावर बांधकाम विभागाचा खर्च
By Admin | Updated: March 26, 2017 22:39 IST2017-03-26T22:39:13+5:302017-03-26T22:39:31+5:30
सटाणा : सोग्रस ते दहीवेल राज्यमार्गाची दुरुस्तीची जबाबदारी टोलकंपनीवर असताना साइडपट्टीच्या कामासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच खर्च केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

बीओटीच्या रस्त्यावर बांधकाम विभागाचा खर्च
सटाणा : सोग्रस ते दहीवेल या राज्यमार्गाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी टोलकंपनीवर असताना ताहाराबाद-दसवेल रोडवरील साइडपट्टीच्या कामासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच पन्नास ते साठ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. बांधकाम विभागाच्या या निधीचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. या कामासंदर्भात सटाणा बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र मंत्री यांनी गंभीर तक्रार केली होती. या संदर्भात बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता हे काम चालू दुरुस्तीच्या निधीमधून करण्यात येत असून, सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे काम ठप्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे काम करणारी एजन्सी ही टोल कंपनीच असल्याचे त्यांनी सांगितले. साइडपट्ट्या नसल्यामुळे अपघात होत असताना दुसरीकडे बीओटीच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असताना त्या रस्त्यावर सीआरची (चालू दुरुस्ती )कामे करून निधीचा अपहार केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. सोग्रस ते दहीवेल हा रस्ता सन २००६मध्ये बीओटी तत्त्वावर बांधून भाबडबारी व पिंपळनेर नजीक टोल वसुली केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल दुरु स्तीची जबाबदारी देखील संबंधित टोल कंपनीची आहे. मांगीतुंगी चौफुली विकसित करण्याच्या नावाखाली मांगीतुंगी फाटा ते दसवेल रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या विकसित करून रस्ता रु ंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू दुरु स्तीच्या निधीमधून मंजूर करण्यात आले आहे. सुमारे पन्नास ते साठ लाख रु पये खर्चाचे हे काम चक्क संबंधित टोल कंपनीला देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.