श्रीनगरात राहुल गांधींना बॉम्बस्फोटात संपविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 01:13 AM2021-08-11T01:13:49+5:302021-08-11T01:14:17+5:30

आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात नोटबंदी लादल्याने अतिरेकी कारवाया नष्ट झाल्या असतील तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी थांबलेल्या श्रीनगरातील ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरावर बॉम्बस्फोट कसा काय घडला? असा सवाल करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार राहुल गांधींना संपविण्याचा कट करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Conspiracy to assassinate Rahul Gandhi in Srinagar | श्रीनगरात राहुल गांधींना बॉम्बस्फोटात संपविण्याचा कट

श्रीनगरात राहुल गांधींना बॉम्बस्फोटात संपविण्याचा कट

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांचा गंभीर आरोप : केंद्र सरकारला ठरविले जबाबदार

नाशिक : आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात नोटबंदी लादल्याने अतिरेकी कारवाया नष्ट झाल्या असतील तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी थांबलेल्या श्रीनगरातील ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरावर बॉम्बस्फोट कसा काय घडला? असा सवाल करीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार राहुल गांधींना संपविण्याचा कट करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने सुरू झालेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विनायक देशमुख, अतुल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली असून, तेथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारीही केंद्र सरकारवर आहे. असे असताना राहुल गांधी थांबलेल्या श्रीनगर येथील ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत अतिरेकी कसे पोहोचले? गांधी परिवाराच्या दोघांनी यापूर्वीच देशासाठी बलिदान दिलेले असून, आता बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून गांधी परिवारालाच संपविण्याचा कट आखला जातो की काय अशी शंका येऊ लागली आहे. हा बॉम्बस्फोट कोणी व कशासाठी केला याची माहिती केंद्र सरकारने देशातील जनतेला द्यावी, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.

आपल्या भाषणात पटाेले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. चीनने भारतात घुसखोरी सुरू केली असून, देश पुन्हा पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे. अशा वेळी सरकारने सर्व विरोधी पक्षांना एकत्र बोलवून वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना पंतप्रधान मात्र संसदेच्या अधिवेशनातही उपस्थित राहत नाही असे सांगून पटोले यांनी, घुसखोरी, फोन टॅपिंगमध्येच सरकार गुंग असून, त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या खासगी आयुष्यातही आता घुसत असल्याचा आरोप केला. देशाला पुन्हा पारतंत्र्याकडे नेणारे सरकार उलथवून टाकण्यासाठी देशस्वातंत्र्यासाठी उभारलेल्या लढ्यासारखा पुन्हा लढा उभारावा लागेल असे सांगून, देश वाचला तर लोकशाही व संविधान वाचेल आणि ती वाचविण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे, असेही शेवटी पटोले यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या भाषणात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना २०१४ पासून देशात जे काही चालले आहे ते पाहता, येणाऱ्या काळात देशात लोकशाही व संविधान जिवंत राहील की नाही याविषयी भीती वाटू लागल्याचे सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे त्यावेळी भाजप व जनसंघ कोठे होते? असा सवाल करून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम अलीकडच्या काळात सुरू झाले असून, या साऱ्या गोष्टीस भाजपच जबाबदार असल्याने त्यांना नैतिकता असेल तर सत्ता सोडावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विनायक देशमुख, अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भाई नगराळे, प्रमोद मोरे, आमदार हिरामण खोसकर, डॉ. सुधीर तांबे, राजाराम पानगव्हाणे, शोभा बच्छाव, कुणाल पाटील, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, संपत सकाळे, स्वप्नील पाटील, अश्विनी बाेरस्ते, बबलू खैरे आदी उपस्थित होते.

चौकट====

यांचा झाला सत्कार

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी व कुटुंबीयातील सदस्यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात सरस्वती मोरे, सुमन मनियार, सत्यभामा मोजाड, लीलाबाई विटाळ, चंद्रभागा येलमामे, राजेंद्र इंगळे, मंदार हुदलीकर, मालिनी कन्सारा, राजेंद्र भाेरे, तुकाराम आटवणे, सुरेश इंगळे.

---------

महिला काँग्रेसला डावलले

काँग्रेसच्या या कार्यक्रमात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. महिला शहराध्यक्ष वत्सला खैरे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही शिवाय प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेेले असताना त्यांचा महिला काँग्रेसच्या वतीने सत्कारदेखील करू दिला जात नसल्याचे पाहून अखेर महिला पदाधिकारी व नगरसेविकांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर थेट व्यासपीठावरच धाव घेत शहराध्यक्ष शरद आहेर यांना जाब विचारला व तीव्र नाराजीही व्यक्त केली. अखेर घाईघाईतच खैरे यांनी पटोले, थोरात यांचा सत्कार करून वादावर पडदा टाकला.

 

Web Title: Conspiracy to assassinate Rahul Gandhi in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.