कॉँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी अद्यापही धोक्यातच
By Admin | Updated: February 1, 2017 00:44 IST2017-02-01T00:44:44+5:302017-02-01T00:44:59+5:30
काही प्रभागांत मतभेद : बुधवारी निर्णय होण्याची शक्यता

कॉँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी अद्यापही धोक्यातच
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा कायम असली तरी तीन ते चार प्रभागांत दोन्ही पक्षांचे उमेदवार तसेच कॉँग्रेसचे काही ठिकाणी अन्य पक्षांच्या उमेदवारांना बरोबर घेण्याची अट अडचणीची ठरली असून, आता बुधवारी (दि.१) त्यावर फैसला होणार आहे. कॉँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा विरोध असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे ज्या प्रभागात सक्षम उमेदवार आहेत, त्याच ठिकाणी कॉँग्रेसने विरोधी पक्षांना बरोबर घेण्याची तयारी केल्याने आघाडीच अडचणीत आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा महिनाभरापासून सुरू आहे. परंतु आता निवडणुकीसाठी यादी घोषित करण्याचाी वेळ आली तरी अद्यापही चर्चा चर्वण सुरूच आहे. नाशिकमधील काही उमेदवारांची यादी घोषित करावी यासाठी कॉँग्रेसचे काही पदाधिकारी आणि नगरसेवक सोमवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी गेले होते, मात्र त्यांची चर्चा होऊ शकली नाही. तोच अनुभव मंगळवारीही आला. दरम्यान, स्थानिक स्तरावर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी भेटले असले तरी काही प्रभागांतील अडचणींवर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवक कविता कर्डक असून, तेथे कॉँग्रेसला जागा हव्या आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात राष्ट्रवादीकडे असलेला एक इच्छुकाला कॉँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी सांगितले जात आहे. दोन्ही कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे हा विषय असल्याने आता तेच बुधवारी या विषयावर निर्णय घेतील, असे कॉँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
आघाडी रखडली
प्रभाग पाच आणि प्रभाग १३ मध्ये मनसे, अपक्ष आणि कॉँग्रेस असे वेगळे पॅनल तयार करण्याचा प्रयोग असून, त्यासही राष्ट्रवादी राजी नाही. प्रभाग १२ मध्ये सर्वसाधारण महिला या जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. प्रभाग १६ मध्येही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीत एका जागेसाठी रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आपल्या विद्यमान नगरसेवकांचा आघाडीसाठी बळी देण्यास तयार नसल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आघाडी रखडली आहे.