काँग्रेस - राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत?
By Admin | Updated: January 30, 2017 00:23 IST2017-01-30T00:23:31+5:302017-01-30T00:23:45+5:30
काही प्रभागांचा वाद : आघाडीच्या उमेदवारांची नावे लांबणीवर

काँग्रेस - राष्ट्रवादीत मैत्रिपूर्ण लढत?
नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नाशिक महानगरपालिकेच्या आघाडीबाबतचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी मान्य केला असून, केवळ पाच जागांवरील अद्याप निर्णय न झाल्याने आघाडीची यादी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आजच्या स्थितीला दोन्ही पक्षांकडे सर्वच प्रभागाकरिता इच्छुकांची नावे असली तरी सक्षम उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक त्यांचप्रमाणे पदाधिकाऱ्यांची कुटुंबातील सदस्यांना व नातेवाइकांना उमेदवारीत स्थान देण्याच्या काही मुद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत झालेले नाही. प्रत्यक्षात दोन्ही पक्षांकडे खऱ्या अर्थाने उमेदवार नाहीत. पण दोन्ही पक्षांच्या संयुक्त आघाडीनंतर काही भागांत दोन्ही पक्षांकडे योग्य उमेदवार नाही, तर काही ठिकाणी
दोन्ही पक्षांचे प्रबळ उमेदवार असल्याने नेमकी जागा कोणी? कोणाला सोडायची यावर निर्णय न झाल्याने अखेर त्यावर मैत्रिपूर्ण लढतीचा फॉर्म्युला पुढे केला गेला, परंतु त्यावर अद्याप स्पष्टमत न झाल्याने आज पुन्हा चर्चा केली गेली. त्यात एकमत न झाल्याने मैत्रिपूर्ण लढतीचा विचार करावा आणि अन्य ठिकाणी निम्मे-निम्मे उमेदवार दिले जाण्याची शक्यता बोलू दाखविली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची बैठक होवून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र रविवारी हे दोन्ही नेते रात्री उशिरापर्यंत नाशकात पोहोचले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडक स्थानिक पदाधिकारी दुपारी एकत्र जमले, मात्र त्यांच्यात फारशी चर्चा उमेदवार यादीबाबत झाली नसल्याचे समजते. तर दुसरीकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांची यादी आणि त्यातून कोण निवडला जावा याबाबत चाचपणी केली गेली, असे सांगण्यात आले. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील रात्री उशिरा नाशकात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सदर अहवाल घेऊन मुंबई येथे जितेंद्र आव्हाड यांच्याशी उद्या चर्चा करून रात्री किंवा परवा सकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार जयवंत जाधव, रंजन ठाकरे, नाना महाले, शरद अहेर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)