कॉँग्रेस संभ्रमात, राष्ट्रवादी पक्ष दोलायमान
By Admin | Updated: January 2, 2017 00:55 IST2017-01-02T00:55:21+5:302017-01-02T00:55:34+5:30
चाचपणी सुरू : कॉँग्रेसमध्ये स्वबळावर मनपा निवडणूक लढण्याची भाषा

कॉँग्रेस संभ्रमात, राष्ट्रवादी पक्ष दोलायमान
नाशिक : महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा युतीबाबत शक्यता धूसर असतानाच कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला, परंतु गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीत घडणाऱ्या घटनांमुळे आघाडीबाबत कॉँग्रेसमध्ये पुनर्विचार केला जात असून, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत तर राष्ट्रवादी दोलायमान स्थितीत आहे.
सेना-भाजपाचा चौखूर उधळलेला वारू रोखण्यासाठी येत्या महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असा सूर लावत दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी दोन महिन्यांपूर्वी एकत्र आले आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडीबाबत उत्सुकताही दाखविली. त्यावेळी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या तुरुंगवासामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करणे फायद्याची नसल्याची चर्चा कॉँग्रेसमध्ये सुरू झाली, परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्तापदापर्यंत जाऊन पोहोचायचे असेल तर आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आघाडीबाबत अनुकूल मते प्रदर्शित केली. मात्र, गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकापाठोपाठ एक भूकंप घडत गेले आणि त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर झाला. राष्ट्रवादीचे माजी खासदार व नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना ५७ लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सध्या पिंगळे हेसुद्धा गजाआड आहेत. पिंगळेंपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे याने बनावट नोटा छापण्याचा केलेला पराक्रम समोर आला. छबू नागरे व राष्ट्रवादीचाच माजी पदाधिकारी घंटागाडीफेम रामराव पाटील हेसुद्धा गजाआड झाले.