शिक्षक संघटनांचे उपमहापौरांना साकडे
By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T23:45:00+5:302015-01-19T00:25:51+5:30
मनपा शिक्षण मंडळ : प्रशासनाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

शिक्षक संघटनांचे उपमहापौरांना साकडे
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती कुंवर यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर गुरुमित बग्गा यांची भेट घेऊन त्यांना तोडगा काढण्याविषयी साकडे घातले. यावेळी उपमहापौरांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच संघटनांच्या सोयीच्या भूमिकेवरही बोट ठेवले.
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती कुंवर यांच्याबाबत महापौर-उपमहापौर आणि आयुक्तांकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे. प्रशासनाधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराबाबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर गुरुमित बग्गा यांची भेट घेऊन कैफियत मांडली. प्रशासनाधिकारी मनमानी कारभार करत असून, बदल्यांप्रकरणी शिक्षकांना विनाकारण टार्गेट केले जात आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला जात नाही. मी जेव्हा निमंत्रित करेल तेव्हाच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटावे, अशी प्रशासनाधिकाऱ्यांची भूमिका असते. ज्येष्ठ शिक्षकांशी बोलताना मर्यादा ठेवली जात नाही. एकेरी नावाने उल्लेख केला जातो. त्यामुळे आपल्या समस्या घेऊन जाताना शिक्षकांमध्ये प्रचंड दहशत असते. याबाबत तोडगा काढण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी उपमहापौरांनी पदाधिकाऱ्यांची म्हणणे ऐकून घेतले; परंतु शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडूनच सोयीची भूमिका घेतली जात असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. यावेळी उपमहापौरांनी शिक्षण मंडळावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहण्यासाठी समितीची स्थापना लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत येत्या महासभेवर त्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यासंबंधीचे सूतोवाच केले. (प्रतिनिधी)