चुकीच्या बॅरिकेटींगमुळे वाहनधारकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:51+5:302021-05-08T04:14:51+5:30
नाशिकरोड : दत्तमंदिर सिग्नल येथून बिटको चौकाकडे येताना पेट्रोलपंपाजवळ केलेल्या चुकीच्या बॅरिकेटींगमुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत असून त्यामुळे अपघात होण्याची ...

चुकीच्या बॅरिकेटींगमुळे वाहनधारकांचा गोंधळ
नाशिकरोड : दत्तमंदिर सिग्नल येथून बिटको चौकाकडे येताना पेट्रोलपंपाजवळ केलेल्या चुकीच्या बॅरिकेटींगमुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
दत्तमंदिर सिग्नल चौकातून बिटकोकडे जाताना लाहोटी पेट्रोलपंपाजवळ लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आडवे बांबू बांधून बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तेथून जेलरोड, देवळालीगाव व शिवाजी पुतळाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे दत्तमंदिर सिग्नल येथून बिटको चौकाच्या दिशेने निघालेली दुचाकी, रिक्षाचालक, रुग्णवाहिका, अवजड वाहने आदींना लाहोटी पेट्रोलपंपाजवळ गेल्यावर रस्ता बांबू बॅरिकेट्स बंद केल्याचे लक्षात येते. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा दत्तमंदिर सिग्नलच्या दिशेने एकेरी मार्गावरून परत जावे लागत असल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. तसेच दत्तमंदिर सिग्नलच्या दिशेने जाणारी वाहने आणि बिटकोच्या दिशेने जाणारी वाहने समोरासमोर येऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. तर बिटको चौकातून परतलले वाहनचालक दत्तमंदिर चौकातून एकेरी मार्गाने बिटको चौकाकडे जातात. त्यामुळे या मार्गावरही वाहने समोरासमोर येत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. बिटको चौकात पवन हॉटेलजवळ बॅरिकेटिंग करून अगोदरच शिवाजी पुतळ्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. आता त्याच्या अलीकडे लाहोटी पेट्रोलपंपाकडे नव्याने बॅरिकेटींग टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले बॅरिकेटींग काढण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.