वीज वितरणचा गोंधळ; नागरिकांना भुर्दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 15:58 IST2020-07-06T15:57:08+5:302020-07-06T15:58:14+5:30
वैतरणानगर : वेळीच बिल भरण्यासाठी सक्ती करणारे विज वितरण विभागाने लॉकडाऊन काळात मीटरचे रिडींग न घेताअव्वाच्या सव्वा बिले नागरिकांच्या माथी मारुन कोणाचा गोंधळ आणि कोणाला भूर्दंड याची प्रचिती दिली आहे. दरम्यान, संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

वीज वितरणचा गोंधळ; नागरिकांना भुर्दंड!
इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कामे व व्यवहार ठप्प होते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्याची गरज असताना वाढीव वीजबिलाच्या माध्यमातून भुर्दंड दिला आहे. लॉकडाऊन मधून कसेबसे सावरलेल्या सर्वसामान्य जनतेला पहिला झटका बसला तो, विज वितरण विभागाचा वाढीव बिलांमुळे आणि सर्व बिलांची वसुली मात्र अनलॉकमध्ये केली जात असताना दुसरा झटका दिला आहे. यातच बिलांमध्ये केलेल्या चुकांचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना बसत असून बिलांच्या दुरूस्तीसाठी ग्रामीण भागातील जनतेला घोटी येथे जावे लागते. मात्र शंकाचे निरासन करण्यासाठी तेथुनही इगतपुरी येथे जाण्याचे सल्ले दिले जात आहेत. एक वेळेस गेल्यानंतर अधिकारी नसल्यास पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसत दुसऱ्यांदा जावे लागत आहे.
ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांना आॅनलाईन भरणा कसा करावा याची माहीती नाही. मात्र विज वितरणचे अधिकारी आॅनलाईन भरणासाठी आग्रही आहेत. यातच बिलामध्ये तफावत असल्याने भरणा करायचा कसा असा प्रश्न वीज ग्राहकांपुढे आहेत. तालुक्यातील काही पतसंस्थेमध्ये वीज बिल भरणा केला जातो मात्र कोरोना असल्यामुळे नागरिक येथे जाण्यास घाबरत आहे. तालुक्यातील विज वितरण विभागाने फिडर प्रमाणे वीज बिल भरणा केंद्र सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.