आढावा बैठकांवरून संघर्ष शिगेला
By Admin | Updated: June 10, 2017 01:11 IST2017-06-10T01:11:04+5:302017-06-10T01:11:12+5:30
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनाही शिस्त लावण्याचा प्रकार जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना रुचलेला नाही

आढावा बैठकांवरून संघर्ष शिगेला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनाही शिस्त लावण्याचा प्रकार जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांना रुचलेला नाही. त्याचाच परिपाक म्हणून की काय, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: जाऊन पंचायत समित्यांच्या आढावा बैठकांचा घेतलेला निर्णय त्यांना रद्द करावा लागल्याचे वृत्त आहे. येत्या १३ जूनपासून जिल्ह्णातील नऊ पंचायत समित्यांच्या आढावा बैठकांचा संयुक्त दौरा लावल्याचे समजते.
यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी ८ ते १० जून दरम्यान पेठ, दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव व बागलाण या सहा तालुक्यांच्या पंचायत समितीत जाऊन आढावा बैठका घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (दि. ८) दिंडोरी व पेठ तालुक्यात जाऊन आढावा बैठकाही घेतल्या; मात्र याची माहिती अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांना मिळताच त्यांनी प्रशासनाकडे याबाबत विचारणा केल्याचे कळते. कारण यापूर्वीच सांगळे यांनी सर्व पंधरा पंचायत समित्यांत जाऊन आढावा बैठका घेण्याचे जाहीर करीत त्यानुसार त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा पंचायत समितीत जाऊन आढावा बैठकाही घेतल्या होत्या. आता मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या तालुका पंचायत समित्यांच्या आढावा बैठकांबाबत त्यांनी प्रशासनाकडे विचारणा करीत सीईओ व अध्यक्ष यांचा संयुक्त दौरा व आढावा बैठका घेण्याची सूचना केल्याचे कळते. त्यानुसार आता १३ जून रोजी सकाळी १० ते १ दरम्यान देवळा व दुपारी २ ते ५ बागलाण, १५ जून सकाळी १० ते १ कळवण व दुपारी २ ते ५ सुरगाण्यात बैठक घेण्यात येणार आहे.