मॉडेल कॉलनी परिसरात पाण्याचा ठणठणाट नागरिक त्रस्त : सिडकोसाठी अन्य भागांवर अन्याय
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:27:30+5:302014-05-23T01:09:00+5:30
नाशिक : मॉडेल कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको विभागात जादा पाणी देण्यासाठी या परिसरातील पाणी पळवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पालिकेने त्वरित मुबलक पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांबरोबरच प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी दिला आहे.

मॉडेल कॉलनी परिसरात पाण्याचा ठणठणाट नागरिक त्रस्त : सिडकोसाठी अन्य भागांवर अन्याय
नाशिक : मॉडेल कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडको विभागात जादा पाणी देण्यासाठी या परिसरातील पाणी पळवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पालिकेने त्वरित मुबलक पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांबरोबरच प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मॉडेल कॉलनी, यशवंत कॉलनी, कल्पनानगर या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सकाळी किंवा सायंकाळी पाणीच येत नाही आणि आले तरी इतके अल्प दाबाने आणि अल्प प्रमाणात असते की त्याचा उपयोग होत नाही. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि छाया ठाकरे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली, तसेच महापालिकेच्या अभियंत्यांनादेखील पाणीपुरवठ्याची स्थिती दाखवली; परंतु तरीही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट अभियंत्यांमध्येच विसंवाद दिसून आला आहे. सातपूर विभागात पपया नर्सरी येथे पाणीपुरवठ्यासाठी व्हॉल्व्ह आहे. तेथून जलवाहिनीद्वारे महात्मानगर आणि समर्थनगर येथील रामराज्य जलकुंभात पाणी उपलब्ध होते. याच व्हॉल्व्हच्या माध्यमातून सिडकोला पाणीपुरवठा केला जात असून, महात्मानगर, मॉडेल कॉलनी परिसराचे पाणी सिडकोला वळवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापालिकेने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्या कार्यालयात नागरिक हंडे घेऊन ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा नगरसेवक शिवाजी गांगुर्डे तसेच शिरीष चौघुले, प्रसाद पवार, सागर सोनवणे, प्रफुल्ल काठे, किशोर जगताप, चंदू कुलकर्णी यांनी दिला आहे.