शेवगेडांग येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:55 PM2021-02-08T16:55:57+5:302021-02-08T16:56:59+5:30

नांदूरवैद्य : शेवगेडांग येथील मारुती मंदिरात सालाबादप्रमाणे मठाधिपती माधव महाराज घुले व महामंडालेश्वर द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने यावर्षीही उत्साहाच्या वातावरणात रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.

Concluding Harinam Week at Shevgedang | शेवगेडांग येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

शेवगेडांग येथे हरिनाम सप्ताहाची सांगता

googlenewsNext

कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा या सर्वांचा सहभाग म्हणजे काला. जो मानवी उद्धारासाठी उच्च कोटीचा आहे. तो प्रत्येकाने स्वीकारलाच पाहिजे. काल्यामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्राला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे नामवंत कीर्तनकार मेजर भास्कर भाईक यांनी सांगितले. काल्याच्या कीर्तनात समारोपप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. काल्यामुळे महाराष्ट्राला व वारकरी सांप्रदायाला एक परंपरा लाभली आहे. काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे पूर्णत्व. यमुनेच्या वाळवंटातील पहिला काला, तर दुसरा काला भूवैकुंठ असलेल्या पंढरपूर येथे उत्साहात साजरा केला जातो, असेही मेजर भाईक यांनी सांगितले. दरम्यान, मागील सात दिवसांपासून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या सात दिवसांमध्ये सुकदेव महाराज वाघ, माधव महाराज घुले, बबन महाराज बहिरवाल, गोविंद महाराज गोरे, ज्ञानेश्वर महाराज कदम, ज्ञानेश्वर महाराज तांबे, निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर, मृदंगाचार्य विकास महाराज बेलूकर, तुकाराम महाराज आरोटे, रोहिदास महाराज मते आदींसह महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनकार तसेच परिसरातील भाविक उपस्थित होते.
काला हा मानवी जीवनासाठी एक अमृतच आहे. जो काला घेण्यासाठी भगवंताला मत्स्य अवतार घ्यावा लागला. मात्र तरीही तो भगवंताला मिळाला नाही. ब्रह्मदेवाला न मिळालेला काला तुम्हा-आम्हाला मिळतो आहे. त्याचे महत्त्व समजले पाहिजे. आजकाल धार्मिक सोहळा म्हटले की, काहीच्या पोटात दुखतंय; पण त्यासाठी तो समर्थ आहे. नामस्मरणच जीवनात तारू शकते. नामाने वासना क्षीण होत जातात, असेही मेजर भाईक यांनी सांगितले.

Web Title: Concluding Harinam Week at Shevgedang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.