मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:52 IST2019-08-24T00:51:30+5:302019-08-24T00:52:15+5:30
ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू
एकलहरे : ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आॅनलाइन दाखले व सुविधा देण्यासाठी राज्यातील २५ हजार ग्रामपंचायतींंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नेमणूक केली आहे. केवळ सहा हजार रुपये इतकाच तुटपुंजा मासिक पगार या परिचालकांना दिला जातो. मात्र तोही चक्क सहा सहा महिने दिलाच जात नाही. सध्या संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात संगणक परिचालकांनी मुंबई येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, प्रतिमहिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे, संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, कैलास मोंढे, लहानू कचरे, राहुल पारधी, अनिल अवचट उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाइन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.