सहायक संचालकांविरुद्ध तक्रारींचा पाढा

By Admin | Updated: January 25, 2015 23:30 IST2015-01-25T23:30:19+5:302015-01-25T23:30:31+5:30

क्रेडाई : नगररचना राज्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीतील प्रकार

Complaints against assistant directors | सहायक संचालकांविरुद्ध तक्रारींचा पाढा

सहायक संचालकांविरुद्ध तक्रारींचा पाढा

नाशिक : नगररचना विभागाच्या सहायक संचालकांविरुद्ध येथील क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी नगररचना राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर अक्षरश: तक्रारींचा पाढाच वाचला. ‘काहीही करा; पण या अधिकाऱ्याला आधी नाशिकमधून हलवा’, अशी राज्यमंत्र्यांना ‘आॅफ द रेकॉर्ड’ विनंतीही यावेळी करण्यात आली.
बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘क्रेडाई’च्या कार्यालयात रविवारी नगररचना राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांविरुद्ध क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने तक्रार केली. सदर अधिकारी बांधकाम व्यावसायिकांबाबत आडमुठे धोरण अवलंबत असून, त्यामुळे हजारो बांधकामांचे पूर्णत्वाचे दाखले खोळंबले आहेत. एक पत्र तयार करण्यासाठी या अधिकाऱ्याला एक दिवस लागतो. एखाद्या ठिकाणी भेट देण्यासाठी चार-चार फोन करावे लागतात. त्यांना मूळ सेवेत परत पाठवण्याचा ठराव महासभेत आॅगस्टमध्येच झाला होता; मात्र त्यावर अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.
नगररचना विभागाच्या उपसंचालक पदावर एकवेळ उशिरा नेमणूक केली तरी चालेल; पण या अधिकाऱ्याला आधी हलवा, अशी गळ यावेळी राज्यमंत्र्यांना घालण्यात घाली. विशेष म्हणजे, राज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात यासंदर्भात एका ओळीचाही उल्लेख नव्हता; शिवाय माध्यम प्रतिनिधींनाही हा विषय ‘आॅफ द रेकॉर्ड’ ठेवण्याची विनंती ‘क्रेडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी केली.
याशिवाय रेडीरेकनरचे दर कमी करावेत, एमआरटीपीचे कलम ३७ (१) मंजूर करावे, महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात नवीन टीपी कायद्याचा अंतर्भाव करावा, अतिरिक्त घोषित क्षेत्रावर तळेगाव दाभाडे योजनेअंतर्गत बाजारमूल्यानुसार ३० टक्के अधिभार आकारून ते शर्तमुक्त करावे, नाशिकच्या सर्व धरणांलगतच्या २ किलोमीटर अंतरापर्यंतच्या क्षेत्राला पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करावे, नाशिक शहराचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून पाठपुरावा करावा, पाटबंधारे खात्याच्या पूररेषेस स्थगिती द्यावी, नगररचना विभागाच्या उपसंचालक पदावर अधिकाऱ्याची नेमणूक करावी, रेफ्युजी एरियासंदर्भातील तांत्रिक अडचण दूर करावी आदि मागण्यांचे निवेदन राज्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर, मानद सचिव नरेश कारडा, जितुभाई ठक्कर, अनंत राजेगावकर, चंद्रकांत धामणे, अविनाश शिरोडे, शंतनू देशपांडे, उमेश वानखेडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Complaints against assistant directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.