कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:17+5:302021-02-05T05:39:17+5:30
पथदिवे बंद असल्याने गैरसोय नाशिक : गांधीनगर मार्केट परिसरातील काही पथदिवे बंद असल्यामुळे या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. ...

कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार
पथदिवे बंद असल्याने गैरसोय
नाशिक : गांधीनगर मार्केट परिसरातील काही पथदिवे बंद असल्यामुळे या परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. या परिसरात सायंकाळी बाजार भरतो. परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येतात. अंधारामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थानिक नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील विक्रेत्यांसह नागरिकांनी केली आहे.
शहरातील उद्यानांची दुरवस्था
नाशिक : शहरातील विविध भागांतील उद्यानांची दुरवस्था झाली असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचला आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या खेळणीची मोडतोड झाली आहे. यामुळे लहान मुलांना या ठिकाणी खेळण्यास जाता येत नाही. महापालिकेने उद्यानांची स्वच्छता करून खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गांधीनगरमधील रस्ते दुरुस्तीची मागणी
नाशिक : गांधीनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिसरातील अनेक नागरिक सायंकाळी या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुुळे त्यांना पायी चालणेही कठीण होते. या परिसरातील किमान रहदारीच्या रस्त्यांची तरी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दूषित पाणी पुरवठ्याची तक्रार
नाशिक : नाशिकरोड परिसरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भुरट्या चोऱ्या वाढल्याने चिंता
नाशिक : शहर परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. किरकोळ चोऱ्यांची दखल घेतली जात नसल्याने या चोरट्यांचे फावते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून भुरट्या चोरांना आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
भाजी विक्रेत्यांची दुचाकीला पसंती
नाशिक : भाजी विक्रीसाठी चारचाकी हातगाडीबरोबरच आता विक्रेत्यांकडून रिक्षा आणि दुचाकीला पसंती दिली जात आहे. अनेक विक्रेते दुचाकीला प्लास्टिक कॅरेट बांधून भाजी विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. यामुळे श्रम व वेळ वाचतो त्याचबरोबर दरराेज नवनवीन भागात जाता येते, असे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले. काही विक्रेत्यांनी रिक्षाला आकार देऊन भाजी विक्रीची व्यवस्था केली आहे.
मोकळ्या पटांगणांवर पोलिसांची गस्त
नाशिक : उपनगर, गांधीनगरमधील मोकळ्या मैदानांवर सायंकाळी होणाऱ्या मद्यपींच्या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील मोकळ्या पटांगणांत पोलिसांची गस्त वाढली आहे. यामुळे अनेक मद्यपींचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत केले जात आहे. पोलिसांनी वारंवार या भागात गस्त घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी वाढली
नाशिक : लॉकडाऊननंतर हळूहळू परिसरात सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या वाढली असून, या कार्यक्रमांना नागरिकांची उपस्थिती वाढली आहे. अनेक विवाह सोहळे आणि इतर घरगुती कार्यक्रमांमध्येही पाहुण्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
चौकांमध्ये रंगू लागली निवडणुकीची चर्चा
नाशिक : पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची शहर परिसरात चर्चा होऊ लागली आहे. चौकाचौकातील कट्ट्यांवर यासंदर्भात आडाखे बांधले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. आपल्या भागातील इच्छुक, त्यांची तयारी, पैसा, पक्ष अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रत्येकजण तावातावाने बोलताना दिसतो.
तपोवन रस्त्यावर गर्दी वाढली
नाशिक : तपोवन रस्त्यावर सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि कमी रहदारीमुळे वाहनांची मर्यादित संख्या यामुळे अनेकांना सकाळी या परिसरात फिरण्याचा मोह होतो. यामुळे दिवसेंदिवस या परिसरात गर्दी वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.