जिल्हाधिकारी, मनपाविरुद्ध अवमान याचिका दाखल
By Admin | Updated: October 14, 2016 00:49 IST2016-10-14T00:41:35+5:302016-10-14T00:49:23+5:30
वृक्षप्रेमी : झाडे अजूनही डांबरीकरणाच्या विळख्यात

जिल्हाधिकारी, मनपाविरुद्ध अवमान याचिका दाखल
नाशिक : शहरात मनपा हद्दीत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवार परिसरात झाडांच्या बुंध्यांना डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकपासून मुक्ती देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने वर्षभरापूर्वी देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने याचिकाकर्ते वृक्षप्रेमींनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्ते निशिकांत पगारे व जगबिरसिंग यांनी सदर माहिती दिली. जिल्हा न्यायालयाने वर्षभरापूर्वी आदेश देऊनही अद्यापही शहरात ठिकठिकाणी झाडांचे बुंधे डांबरीकरण व पेव्हर ब्लॉक यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आलेले नाहीत. याबाबत याचिकाकर्त्यांनी मनपा व जिल्हा प्रशासन यांना वारंवार स्मरणपत्रे देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर याचिकाकर्त्यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. धिरेंद्र पोंक्षे, अॅड. सर्वेश झोडगेकर, अॅड. रसिका लेले, अॅड. वैभव देशमुख, अॅड. सत्कार गोसावी, अॅड. मंजूषा बैरागी आदि काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)