कोटंबीच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांविरोधात तक्रार
By Admin | Updated: May 29, 2014 00:18 IST2014-05-28T23:39:41+5:302014-05-29T00:18:13+5:30
अतिक्रमण व बनावट सर्वेक्षण यादी तयार केल्याचा आरोप

कोटंबीच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांविरोधात तक्रार
अतिक्रमण व बनावट सर्वेक्षण यादी तयार केल्याचा आरोप
नाशिक : पेठ तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी निर्मल ग्राम अंतर्गत शौचालय असतानाही नसल्याचे दाखवून प्रत्येकी साडेचार हजारांचा लाभ घेतल्याचे, तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी कोटंबीचे ग्रामस्थ शशिकांत भुसारे व रंजना भुसारे यांनी केली आहे.
यासंदर्भात भुसारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय अपर आयुक्त, तसेच पेठ तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज केला आहे. कोटंबी ग्रामपंचायतीचे सरपंच वनिता दिलीप भुसारे, उपसरपंच पंढरीनाथ पालवी, सदस्य भास्कर पांडुरंग भुसारे, जयवंत पुंडलिक राऊत व देवता सुधाकर राऊत यांनी शौचालय बांधकामापोटी प्रत्येकी ४ हजार ६०० रुपये घेतले असून, काही सदस्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे. शौचालय उभारणीसाठी गरजू लाभार्थ्यांची सर्वेक्षणानंतर यादी तयार असताना ती प्राधान्यक्रमाने न पाहता स्वत:च्या अधिकारात लाभ घेतल्याचा आरोप रंजना भुसारे व शशिकांत भुसारे यांनी केला आहे. या सर्वांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४(ग) नुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.(प्रतिनिधी)