कळवण, सुरगाणा तालुक्यांना पावणेसात कोटी भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 00:43 IST2021-07-08T23:58:17+5:302021-07-09T00:43:45+5:30
कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण तालुक्यातील नुकसानभरपाईपोटी १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

कळवण, सुरगाणा तालुक्यांना पावणेसात कोटी भरपाई
कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. त्यानुसार शासनाने आता सुरगाणा तालुक्यातील नुकसानभरपाई पोटी ६ कोटी ६८ लाख २६ हजार रुपये, तर कळवण तालुक्यातील नुकसानभरपाईपोटी १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील नुकसानीचा प्रस्ताव सादर करून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कळवण व सुरगाणा तालुक्यासाठी निधी मंजूर झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे कळवण तालुक्यातील ११३ घरांचे नुकसान झाले होते. त्यानुसार भरपाई पोटी १६ लाख ९५ हजार रुपये, तर २ शेतकऱ्यांच्या १.८० हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाच्या नुकसानभरपाईपोटी ९० हजार रुपये असे १७ लाख ८५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील ४२४ घरांचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ६३ लाख ६० हजार रुपये निधी मंजूर झाला आहे, तर सुरगाणा तालुक्यातील १२०८ हेक्टर क्षेत्रातील ५,७८४ शेतकऱ्यांच्या आंबा पिकाच्या नुकसानभरपाईपोटी शासनस्तरावरून ६ कोटी ४ लाख ६६ हजार ५१० रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लवकरच भरपाईचे वितरण
वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले, अनेक ठिकाणी वादळाने विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले होते . एकीकडे कोरोनाने आदिवासी भागात हातपाय पसरले होते, तर दुसरीकडे तोक्ते चक्रीवादळाने अतोनात नुकसान झाल्याने आदिवासी बांधव संकटात सापडला होता. आमदार पवार यांनी शासकीय यंत्रणेसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आदिवासी बांधवांना दिलासा देत नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत लवकरच नुकसानभरपाई पोहोचविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.